लोक जैवविविधता नोंदवह्यांचे मूल्यांकन करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
Summary
मुंबई, दि. ८ :- राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार लोक जैवविविधता नोंदवह्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक असून याकरिता समिती गठित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य जैवविविधता मंडळाकडून प्राप्त प्रस्तावानुसार सनियंत्रण समिती गठित करावी, असे निर्देश वन राज्यमंत्री दत्तात्रय […]
मुंबई, दि. ८ :- राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार लोक जैवविविधता नोंदवह्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक असून याकरिता समिती गठित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने राज्य जैवविविधता मंडळाकडून प्राप्त प्रस्तावानुसार सनियंत्रण समिती गठित करावी, असे निर्देश वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता अधिनियमांतर्गत करण्यात आलेल्या लोक जैव विविधता नोंदवह्यांचा (P.B.R.) आढावा आणि जैव विनियोग वाटप प्रणाली अंमलबजावणी संदर्भात वने राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव, उपसचिव (वने) गजेंद्र नरवणे आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले की, लोक जैव विविधता नोंदवहीची गुणवत्ता उत्तम दर्जाची राहील यासाठी आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या नोंदवह्यांच्या कामाची गुणवत्ता तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. ही गुणवत्ता असेल तर लोक जैविक विविधता नोंदवह्यांचा फायदा स्थनिक ग्रामस्थांना मिळू शकेल. त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. भरणे यांनी दिले.