औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

‘लोकसभा निवडणूक २०२४’ सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक संयुक्त नाकेबंदी करुन आचारसंहिता अंमलबजावणीचे नियोजन – जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

Summary

छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करुन आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थे संदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येईल असे सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय झाला. लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सीमावर्ती […]

छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका):- लोकसभा निवडणूक कालावधीत सर्व संलग्नित सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करुन आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थे संदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येईल असे सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय झाला.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सीमावर्ती जिल्हा समन्वय बैठक दूरदृष्य प्रणालीद्वारे घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जळगाव जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जालना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नाशिक जलज शर्मा, बीड दीपा मुधोळ मुंडे, अहमदनगर सिद्धाराम सालीमठ, बुलडाणा डॉ. किरण पाटील, धाराशिव डॉ. सचिव ओम्बासे  तसेच सर्व संबंधित जिल्ह्यांचे  पोलीस अधीक्षक, संलग्नित तालुक्यांचे तहसिलदार  तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर,आदी अधिकारी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याशी संलग्नित असलेल्या जालना, जळगाव, धाराशिव, बीड, बुलडाणा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमधील निवडणूक टप्पे व त्या अनुषंगाने करावयाचा सुरक्षा व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.  त्यात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, जिल्ह्यांच्या सीमाक्षेत्रात नाकाबंदी करणे,मद्य वाहतुक, प्रतिबंधात्मक कारवाई केलेले, तडीपारी केलेल्या  गुन्हेगारांची माहिती आदानप्रदान करणे, मतदारांच्या दुबार नोंदणी तपासणी करणे, टपाली मतदानाबाबत अशा विविध मुद्यांच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, संलग्नित जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात येणार आहे. त्यात पोलीस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क इ. यंत्रणांचे अधिकारी- कर्मचारी असतील. ते त्या त्या अनुषंगाने तपासणी करुन कारवाई करतील. वन क्षेत्राच्या हद्दीतील भागात वन विभागाचे अधिकाऱ्यांचे तपासणी नाके असतील.

संपूर्ण निवडणूक कालावधीत या सर्व नाक्यांवर तपासणी करुन सर्व हालचालींवर नजर ठेवणे, मद्य वाहतुक विशेषतः मद्यविक्री बंद असल्याच्या कालावधीत संलग्नित तालुक्यात कडक तपासणी करणे. टपाली मतदानाच्या अनुषंगाने कार्यवाही करणे, तपासणी नाक्यांवरील मनुष्यबळाचे व्यवस्थापन करणे इ. मुद्देनिहाय चर्चा करुन या सर्व मुद्यांवर संयुक्त कारवाई करणेबाबत सहमती करण्यात आली. तसेच विषयनिहाय संबंधित सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अशा सगळ्यांनी आपापल्या विषयांसंदर्भात आदानप्रदान करावे असेही ठरविण्यात आले.

 

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *