लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांची संख्या वाढवा- डॉ. संजय बापेरकर
Summary
मुंबई महापालिकेच्या साफ-सफाई खात्यातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘घन कचरा व्यवस्थापन खात्याचे “प्रमुख अभियंता, श्री.प्रशांत पवार” यांच्या दालनात बैठक पार पडली. मुंबई ची लोकसंख्या १९८१ साली सुमारे ५२ लाख होती त्यावेळेपासुन साफ- सफाई खात्यातील कर्मचारी संख्या ३१६१७ एवढीच आहे. सध्या […]

मुंबई महापालिकेच्या साफ-सफाई खात्यातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘घन कचरा व्यवस्थापन खात्याचे “प्रमुख अभियंता, श्री.प्रशांत पवार” यांच्या दालनात बैठक पार पडली. मुंबई ची लोकसंख्या १९८१ साली सुमारे ५२ लाख होती त्यावेळेपासुन साफ- सफाई खात्यातील कर्मचारी संख्या ३१६१७ एवढीच आहे. सध्या मुंबईची लोकसंख्या सुमारे सव्वा दोन कोटी झाली आहे.मात्र २८०३६ कर्मचारीच कार्यरत असुन, ३५८१ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे तात्काळ भरावीत व लोकसंख्येच्या प्रमाणात किमान ३० हजार सफाई कामगारांची पदे वाढवावी अशी मागणी “मुनिसिपल कर्मचारी कामगार सेने” चे उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केली आहे. वाढलेला कचरा त्याचे संकलन व विल्हेवाट याचा आढावा घेऊन कामगार संख्या वाढविण्याबाबत वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आश्वासन प्रमुख अभियंता श्री. पवार यांनी दिले आहे.
पर्यवेक्षिय संवर्गाची- कनिष्ठ अवेक्षक १०५ ,सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक २० व उपमुख्य पर्यवेक्षक ४ ही सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
सफाई खात्यातील सर्वच ४०० चौक्यांचे नुतनीकरण करण्यात येणार असुन, युनियनच्या मागणीनुसार प्रत्येक सफाई चौकीवर पिण्याचे पाणी (ॲक्वागार्ड) , पुरुष व स्त्री कामगारांना स्वतंत्र शौचालय, स्वतंत्र चेंजीग रूम ई. ची सोय केली जाणार आहे. तसेच दादर चैत्यभूमी येथील सफाई चौकी “मॉडेल चौकी” म्हणुन बांधली जाणार असल्याची माहीती बापेरकर यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या आस्थापना कामांचा तसेच प्रलंबित पी. टी. प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याचे आश्वासन श्री. पवार यांनी दिले. त्यासाठी लिपिक संवर्गाची १४५ रिक्त पदे तातडीने भरण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
सदर बैठकीस चिटणीस संजय वाघ, रामचंद्र लिंबारे व महेश गुरव तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.