लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविले – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह
Summary
अमरावती, दि. 1 : लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना शब्द आणि आवाज देतानाच लोकशाहीरांनी चळवळीत चैतन्य जागवले, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. […]
अमरावती, दि. 1 : लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना शब्द आणि आवाज देतानाच लोकशाहीरांनी चळवळीत चैतन्य जागवले, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माताखिडकी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, लोकशाहीर अण्णा भाऊंनी स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले आहे. त्यांनी श्रमिकांच्या चळवळीत चैतन्य जागवले. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी मनामनात क्रांतीची ठिणगी पेटविली.
या समारोहाला आयोजक प्रभाकर वाळसे, माजी महापौर विलास इंगोले, माजी जि.प. सभापती जयंतराव देशमुख, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलूभाऊ शेखवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.