लेखकांनी ऐतिहासिक संशोधनपर लेखनावर अधिक भर द्यावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) : बंजारा समाजाचा इतिहास जगासमोर आणून या समाजास विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य होते आहे. त्याचप्रकारे इतर समाजातील लेखकांनी देखील अशाप्रकारचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन दर्जेदार ऐतिहासिक संशोधनपर लेखन करावे, असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काढले.
तापडिया नाट्य मंदिर येथे हिंद ए रत्न मल्लुकी बंजारन, शहिद ए आजम लक्खशाह बंजारा या स्वर्णिम बंजारा इतिहासाच्या दहा खंडांपैकी पहिल्या दोन खंडांचे लोकार्पण मंत्री सामंत यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रोहयो मंत्री संदीपान भूमरे, आमदार अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, यू.पी राठोड, साईनाथ दुर्गे, लेखक डॉ. अशोक पवार, डॉ. सुनीता राठोड-पवार आदींची उपस्थिती होती.
मंत्री सामंत म्हणाले, एखाद्या संशोधनावर 22 वर्ष अव्याहतपणे काम करणे निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे डॉ.अशोक पवार, डॉ.सुनिता राठोड-पवार या कुटुंबियाचे कौतुक आहे. स्वखर्चातून त्यांनी हा इतिहास जगासमोर आणला. या संशोधनाचा भावी पिढीस मोलाचा फायदा होईल. दहा खंड प्रकशित झाल्यास इतिहासात महत्वाची भर पडेल, असेही मंत्री सामंत म्हणाले. कार्यक्रमात पारंपरिक नृत्याद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ध.सु. जाधव यांनी केले. आभार डॉ. सुनीता राठोड-पवार यांनी मानले