लाखांदूर महसूल विभागाचा ‘महा-धडाका’! आता वर्षातून ६ वेळा भरणार ‘महाराजस्व समाधान शिबीर’; प्रशासन थेट जनतेच्या दारी! विरली बु. येथे ७ मार्चला रंगणार लोकदरबार; उपजिल्हाधिकारी लोंढे व तहसीलदार वैभव पवार यांचे ‘मिशन समाधान’
Summary
लाखांदूर: सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यापासून मुक्ती देण्यासाठी आणि शासनाच्या योजना थेट घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लाखांदूर तहसील प्रशासनाने कंबर कसली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आता नव्या जोमाने राबवले जाणार असून, तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर वर्षातून तब्बल […]
लाखांदूर:
सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यापासून मुक्ती देण्यासाठी आणि शासनाच्या योजना थेट घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लाखांदूर तहसील प्रशासनाने कंबर कसली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आता नव्या जोमाने राबवले जाणार असून, तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर वर्षातून तब्बल ६ वेळा या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
७ मार्चला विरली बु. मध्ये महा-शिबिर!
या अभियानाचा पहिला टप्पा शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी विरली बु. येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी १० ते ५ या वेळेत पार पडणार आहे. या शिबिरात नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात येणार असून, प्रलंबित कामे तातडीने निकाली काढली जातील.
प्रशासकीय यंत्रणेला ‘ॲक्शन मोड’वर राहण्याचे निर्देश
नुकत्याच पार पडलेल्या आढावा सभेत उपजिल्हाधिकारी लोंढे आणि लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी महसूल यंत्रणेला कडक निर्देश दिले आहेत. नागरिकांना तहसील कार्यालयात येण्याची गरज भासू नये, यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित सर्व विभागांनी एकाच छताखाली उपस्थित राहून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिबिराची खास वैशिष्ट्ये आणि मिळणारे लाभ:
जागेवरच निकाल: फेरफार नोंदी, जातीचे दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र आणि रेशन कार्डशी संबंधित अडचणींचे तात्काळ निवारण.
योजनांचा लाभ: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांसह इतर कल्याणकारी योजनांचे अर्ज स्वीकारले जातील.
पारदर्शकता: महसूल प्रशासनाचा हा ‘लोकदरबार’ पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने चालणार असून, सर्व अधिकारी एकाच वेळी उपलब्ध असतील.
”सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे. या शिबिराच्या माध्यमातून लाखांदूर तालुक्यातील एकही नागरिक शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही, याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत.”
— वैभव पवार, तहसीलदार, लाखांदूर.
