लहानग्या आदितीचे मंत्रिमंडळाने केले कौतुक; पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी!
Summary
लहानग्या आदितीचे मंत्रिमंडळाने केले कौतुक; पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी! मुंबई, दि. 18 : औरंगाबादला सातवी इयत्तेत शिकणाऱ्या आदिती दिपक जाधव या मुलीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिला डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतली रौप्य पदकाची 2000 रुपयांची पारितोषिकांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा […]
लहानग्या आदितीचे मंत्रिमंडळाने केले कौतुक; पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी!
मुंबई, दि. 18 : औरंगाबादला सातवी इयत्तेत शिकणाऱ्या आदिती दिपक जाधव या मुलीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिला डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतली रौप्य पदकाची 2000 रुपयांची पारितोषिकांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली असून या संकटकाळात आपणही काही तरी मदत करावी या भावनेने ‘खारीचा वाटा’ उचलत असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
आदितीने आपल्या मदतीचा धनादेश पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे नुकताच दिला होता. मुख्यमंत्र्यांना तिने लिहिलेले पत्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाचून दाखवण्यात आले. यावेळी सर्व मंत्र्यांनी तिचे कौतुक केले.
पत्रात आदितीने म्हटले आहे की, नुकताच राज्यात महापूर येऊन गेला. या पूरग्रस्तांच्या मदतीची आपली धडपड पाहिली. यातून आपले नेतृत्व आणखी उठून दिसले. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं वाटलं. खरंच अवघड आहे हे सगळं, आपले काम पाहून वाटायचं, आपण यात खारीचा वाटा उचलला पाहिजे, पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे. मला माहित आहे मी लहान आहे, पण मला डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत मिळालेली बक्षीसाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी वाटली आणि म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहे.
आदितीने दिलेली मदत अनमोल असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिला खूप सारे आशीर्वाद दिले आहेत तसेच तुम्ही बालमंडळीच या देशाचा भक्कम आधारस्तंभ असल्याचेही म्हटले आहे.