महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ६ हजार ६७७ पशुपालकांच्या खात्यांवर १७.१६ कोटी रुपये जमा – सचिंद्र प्रताप सिंह

Summary

मुंबई, दि. १७ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ६ हजार ६७७ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १७.१६ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. १७ नोव्हेंबर, २०२२ अखेर 34 जिल्ह्यांमधील […]

मुंबई, दि. १७ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ६ हजार ६७७ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १७.१६ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. १७ नोव्हेंबर, २०२२ अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 608 संसर्गकेंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 263755 बाधित पशुधनापैकी एकूण 189912 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 17 हजार 658 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लाख लम्पी प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.89 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 98.55 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार विषयक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना  आवाहन करण्यात आले की त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.

नुकत्याच क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत  झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण  न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही श्री.सिंह यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *