रोहा सुकळी घाटावर रेती तस्करांचा आतंक कुणालाही न जुमानता रात्रंदिवस रेतीचा उपसा महसूल व पोलीस विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
प्रतिनिधी मोहाडी:- जिल्ह्यात सर्वाधिक रेतीची तस्करी ही मोहाडी व तुमसर तालुक्यातून होत असते. आता तर रोहा व सुकळी घाटावर रेती तस्करांचा आतंक पहावयास मिळतो. कुणालाही न जुमानता काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरद हस्तामुळे रेती तस्कर वरचढ झाले आहेत. दररोज शेकडोच्या संख्येने ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून रात्रं दिवस रेतीचा उपसा होताना दिसून येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असताना महसूल विभाग व पोलीस विभागाचे दुर्लक्ष कसे? असा प्रश्न निर्माण होतो. जणू त्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे असे वाटते. रोहा व सुकळी घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असताना अधिकाऱ्यांचे हात मात्र पिवळे झाल्याने ते कोमात गेल्याचे चित्र दिसत आहे. रेती चोर व अधिकारी मालामाल होत आहेत तर नदीची मात्र दुरावस्था होऊन शासनाचा करोडोचा महसूलही बुडत आहे.
भंडारा जिल्ह्यात वैनगंगा व सुर नदी सारख्या इतरही नद्या असल्याने येथील रेतीची सर्वत्र मोठी मागणी आहे. नागपूर परिसरात रेतीला चांगला भाव आहे. शिवाय रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्करांची चांदी आहे. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी अधिकाऱ्यासोबत सांठगाठ करून रेती तस्करीचा उघडा आतंक सुरू केल्याचा प्रकार रोहा व सुकळी घाटावर पाहावयास मिळतो. मोहाडी तालुक्यातील रोहा व तुमसर तालुक्यातील सुकळी हे दोन्ही घाट दोन तालुक्यातील असले तरी ते पोलीस स्टेशन मोहाडी हद्दीत येतात. दोन्हीही तहसील कार्यालयाचे तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी व ठाणेदार व वरिष्ठ अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी तुमसर यांचे हात पिवळे झाले असल्यामुळे यांनी रेती चोरांसाठी रान मोकळे करून दिले आहे. त्यामुळे रोहा येथील 150 ट्रॅक्टर, 20 टिप्पर, सात जेसीबी, सुकळी येतील दहा ट्रॅक्टर, पाच टिप्पर रेती काढणे भरणे व वाहतूक करणे कामात लागले आहे. दिवस असो की रात्र टिप्पर-ट्रॅक्टर व जेसीबी कामात लागले आहेत. नदीतून काढलेली रेती घाटकुरोडा रोडवर स्मशानभूमी परिसरात मोठ मोठे रेती साठवलेले ढीगार दिसून येतात. याची जाणीव लहान कर्मचारी ते वरिष्ठ अधिकारी यांना आहे. परंतु काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात पिवळे झाले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. लोकांना हे कृत्य दिसते, परंतु वरिष्ठांना हे कृत्य दिसत नाही ही शोकांतिका आहे.
तुमसर येथील महसूल विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी यांनी तहसील कार्यालय तुमसर येथील एका लिपिकास व माडगी येथील रेती तस्करास वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्येक घाटावरील ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी मालकांकडून हे मोठ्या प्रमाणात वसुली करतात. माडगी येथील रेती तस्कर वसुली अधिकारी यांनी पंधरा दिवसाआधी एक नवीन टिप्पर घेतल्याचीही चर्चा आहे. हा वसुली अधिकारी त्या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आसरा घेऊन मोहाडी तालुक्यातील देवाडा (बु.) येथील वैनगंगा नदीतून उपसा करून शिवपार्वती मंदिर रोडवर रेती साठवून टिप्पर भरून बाहेरगावी विक्री करतो हे विशेष.
शेतच कुंपण खातो. त्यामुळे रेती चोर शिरजोर होत आहे. यातील तहसील कार्यालय तुमसर येथील वसुली अधिकाऱ्यास देवाडा येथील रेती तस्कर यांनी धक्का देऊन ट्रॅक्टर खाली पाडले याची तक्रार करडी पोलीस स्टेशन येथे झाली. परंतु ७० हजार रुपये घेऊन त्या वसुली अधिकाऱ्यांनी आपली तक्रार परत घेतल्याची खात्रीदायक सर्वत्र चर्चा आहे. रेतीचोर हा या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चोरीच्या मोबदल्यात पैसे देतो व या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरचढ होतो ही विशेष चर्चेची बाब आहे. त्यामुळे रोहा व सुकळी रेती घाटाकडे जिल्हा पातळीवरून लक्ष देण्याची गरज आहे.
संपत्तीची चौकशी करा
मोहाडी व तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे. रोहा व सुकळी घाटावर रेती तस्करांनी उच्चांक गाठला आहे. यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्करांनी अहोरात्र रेतीच्या उपसा सुरू केला आहे यात काही अधिकारी व कर्मचारी मालामाल झाल्याची चर्चा आहे त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी होत आहे.
शेत पिकासह रस्त्याचे नुकसान
रेती तस्करीच्या वाहनांच्या रात्रंदिवस वरदळी मुळे रस्त्यालगत शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सतत वाहतुकीच्या धुरामुळे शेतपीक नापिक झाल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. शिवाय शेताकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था होत आहे. यात शेतकऱ्यांना रात्रंदिवस वाहतुकीमुळे अपघाताची भीती वाटत असते.
या मार्गावरून होत आहे रेतीची तस्करी
चोरी केलेल्या रेतीची सर्वाधिक विक्री नागपूर परिसरात होत असते. तुमसर व मोहाडी परिसरातील रेतीची सर्वाधिक वाहने हे वरठी, एकलारी, बीड, सातोना, शहापूर मार्गे नागपूरला जातात. काही वाहने मोहाडी येथील माता चांडेश्वरी मंदिराजवळून हरदोली-नेहरी सातोना शहापूर मार्गे नागपूरला जातात. तर काही वाहने रोहा बेटाळा भंडारा येथून नागपूर व या मार्गावरून जातात. विशेष ही वाहतूक रात्री नऊ वाजता पासून सकाळी सहा वाजता पर्यंत रात्रभर सुरू असते. सातोना येथे चौकी लावल्यास मोठ्या प्रमाणात रेती तस्करीवर आळा बसू शकतो.
ओव्हरलोड भीम काय वाहनांमुळे रस्त्याची दुरावस्था
रेती तस्करी करणारी वाहने ही भीम काय स्वरूपाची असतात. शिवाय यात भरण्यात आलेली रेती ही नेहमी ओव्हरलोड असते. त्यामुळे तुमसर ते भंडारा एकलारी ते बीड सातोना ते शहापूर तसेच वरठी ते पांढराबोडी सहित भंडारा रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. या भीम काय वाहनांमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सर्वसामान्य जनतेला प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.