राहाता मधील ‘बीएलओ’च्या नाविन्यपूर्ण संकल्पना राज्यासाठी मार्गदर्शक – मुख्य निवडणूक अधिकारी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या ‘बीएलओं’चा विशेष गौरव
Summary
शीर्डी, दि.११ सप्टेंबर (उमाका वृत्तसेवा) – राहाता तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ‘कुटुंब रजिस्ट्रर’सारख्या राबविलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना राज्यातील बीएलओंसाठी मार्गदर्शक आहेत. असे गौरवोद्गार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे केले. ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी […]
शीर्डी, दि.११ सप्टेंबर (उमाका वृत्तसेवा) – राहाता तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) ‘कुटुंब रजिस्ट्रर’सारख्या राबविलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पना राज्यातील बीएलओंसाठी मार्गदर्शक आहेत. असे गौरवोद्गार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे केले.
ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागाचे आधार प्रमाणीकरण शंभर टक्के पूर्ण केले आहे. अशा ‘बीएलओ’चा मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांच्या हस्ते ‘विशेष प्रशस्तीपत्र’देऊन शिर्डी येथे गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी राहाता तालुक्यातील ‘बीएलओ’शी सहज संवाद साधला. यावेळी अहमदनगरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, सुधाकर ओहोळ उपस्थित होते. आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या बाळासाहेब नाईकवाडे, भुसाळ नानासाहेब, सोमनाथ येलमामे व बाळू सोसे या बीएलओंचा यावेळी विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
श्री.देशपांडे यावेळी म्हणाले की, मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम राज्यभर १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मतदार, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आवश्यक आहे. ‘बीएलओ’च्या कामात मतदारांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने उपाययोजना केली असून यापूर्वी वर्षातून एकदा मतदार नोंदणी केली जायची. तथापि आता भारत निवडणूक आयोगाकडून वर्षातून ४ वेळा म्हणजेच १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.असे ही श्री.देशपांडे यांनी सांगितले.
यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी राहाता येथील बीएलओ यांच्या आधार प्रमाणीकरण कामाच्या नावीन्यपूर्ण संकल्पना जाणून घेतल्या. यामध्ये मतदार भागाचे अद्यावत कुटुंब रजिस्ट्रर ठेवणे, ग्रामसभा, पारायणे, सप्ताह, मेळावे, जत्रा उत्सव या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करणे.
समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचणे. प्रत्येक मतदाराच्या घरास भेट देणे. यासारख्या वेगवेगळ्या पध्दतींचा अवलंब करून मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण व आधार संलग्नीकरणांचे काम करण्यात येते. असे अनुभव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दत्ता गायकवाड, संदीप गाडे, विजय फटांगरे, ज्ञानदेव जवक, देविदास बनकर, राजूभाई सय्यद व निखिल हातांगळे यांनी सांगितले.
‘गरूडा’ ॲप मध्ये आडनाव यावे, अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे मतदार यादी यावी, मतदार यादी मधील नावात दुरूस्ती करता यावी, तसेच मतदारांना ओळखपत्र ऑनलाईन डाऊनलोड करता यावे. अशा नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे शक्य आहे. असे बीएलओनी यावेळी सांगितले. त्यावर राहाता तालुक्यातील बीएलओंनी सूचविलेल्या संकल्पना उल्लेखनीय व वेगळ्या आहेत. या सूचनांचानिवडणूक कार्यालयास निश्चित उपयोग होणार असून या सूचनांचा निश्चित विचार केला जाईल.असे ही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी सांगितले.