BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘राष्ट्रीय पोषण माह’ च्या माध्यमातून कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवूया – मंत्री आदिती तटकरे

Summary

मुंबई, दि. १७ : मुंबईसह राज्यात कुपोषण कमी करण्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे योगदान मोलाचे असून, सुपोषित भारतासह कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याची संधी आपल्याला लाभली आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आठव्या […]

मुंबई, दि. १७ : मुंबईसह राज्यात कुपोषण कमी करण्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे योगदान मोलाचे असून, सुपोषित भारतासह कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याची संधी आपल्याला लाभली आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आठव्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, उपायुक्त संगीता लोंढे, उपायुक्त विजय क्षीरसागर यांच्यासह अधिकारी, पर्यवेक्षक, मुख्य सेविका, सेविका, मदतनीस हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, नवनियुक्त मदतनीस व सेविका यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले. राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जनजागृतीसाठी २०१८ पासून पोषण माह अभियान राबविण्यात येते. पोषण माह सप्ताहात दरवर्षी राज्य उत्कृष्ठ ठरले असून, यंदाही आपण समन्वयाने देशात उत्कृष्ठ काम करून, कुपोषण समूळ नष्ट करण्याकडे वाटचाल करूया.

सुपोषित राज्य करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असून, यासाठी १८ हजार पदांची भरती करण्यात आली आहे. मातृवंदना योजना राबविण्यातही राज्य आघाडीवर असून, ६३ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्याच्या निरोगी व उज्वल भविष्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. सेविका आणि मदतनीस या पोषण आहाराच्या आधारस्तंभ असून, गावोगावी, घराघरात पोषण, आरोग्य आणि शिक्षण यांचा संदेश पोहोचविण्याचे काम त्या करीत आहेत.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पोषण भी पढाई भी’, अर्भक व बालक आहार पद्धती, शिक्षण, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणारे रेशन, बेबी किट, सुपोषित ग्राम पंचायत योजना, पोषण अभियान अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरजू महिलांना लाभ देण्यात येत आहे. तसेच त्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे.

पोषण महा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट सेविका, मदतनीस व अंगवाडी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

आयुक्त कैलास पगारे यांनी राष्ट्रीय पोषण माह राज्यात एकूण ५५३ बाल विकास प्रकल्पातील एक लाख १० हजार ६२९ केंद्रात राबविण्यात येते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील २५ लाख ८२ हजार ३३० बालके, ३ ते ६ वयोगटातील २४ लाख ७४ हजार ४१७ बालके, ४ लाख ३२ हजार २३४ गरोदर महिला व ४ लाख २३ हजार ७५६ स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत.  केंद्र सरकारने पोषण माहसाठी सहा विशेष ‘थीम’ ठरविल्या आहेत. यामध्ये लठ्ठपणा कमी करणे, अर्भक व बालक आहार पद्धती, पुरुषांचा बालकांच्या पोषण आणि आरोग्याच्या काळजीत सहभाग, वोकल फॉर लोकल, एकत्रित कृती व डिजीटायझेशन या थीमनुसार विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नव चेतना अभियान राबविण्यासाठी ३७ हजार मदतनीस व सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानही याच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. गतवर्षी गडचिरोली येथून या अभियानाचा शुभारंभ करून देशात राज्य अव्वल ठरले होते. यंदाही उत्कृष्ट कामगिरी बजाविणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *