राष्ट्रवादीत दोन गट! कोणतीही पूर्वसूचना न देता तालुकाध्यक्ष पदावरून केले पायउतार
Summary
अनेक पदाधिकारी सामुहीक राजीनामा देण्याच्या तयारीत मंगळवेढा पंढरपूरचे दिगवंत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर लवकरच पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणुकी होणार आहे. यावेळी आखाड्यात भगीरथ भालके हे उतरण्याची शक्यता आहे. डबघाईला आलेल्या विठ्ठल साखर कारखान्याची गाडी रुळावर आणण्याची कसरत करतानाच भगीरथ […]
अनेक पदाधिकारी सामुहीक राजीनामा देण्याच्या तयारीत
मंगळवेढा पंढरपूरचे दिगवंत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर लवकरच पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणुकी होणार आहे. यावेळी आखाड्यात भगीरथ भालके हे उतरण्याची शक्यता आहे.
डबघाईला आलेल्या विठ्ठल साखर कारखान्याची गाडी रुळावर आणण्याची कसरत करतानाच भगीरथ दादांना पोटनिवडणुकी गड राखायचे मोठे आव्हान आहे.
त्यामुळे भालके गटाबरोबरच राष्ट्रवादी पक्षातही सर्वांना सोबत घेऊन जाणे महत्वाचे आहे. मात्र राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदावरून सध्या गल्लीत गोंधळ अन दिल्लीत मुजरा अशी परिस्थिती दिसून येत आहे.
पक्षाला मोठ मोठे नेते सोडून जात असताना तालुक्यात पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्यांना डावलून अचानक तालुकाध्यक्ष पदावरून पायउतार केल्याने पंढरपूर तालुक्यात खळबळ माजलीय.
आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी अँड.दीपक पवार यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पदावरून पायउतार केले. आणि कासेगावचे विजयसिंह देशमुख यांची निवड केली. त्यामुळे राष्ट्रवादीत खळबळ माजलीय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शनिवारी पक्षाच्या निरीक्षकांनाच्या उपस्थितीत पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी झाली. यावेळी भगीरथ भालके यांचे नाव एकमताने घेण्यात आले.
तर तालुकाध्यक्ष पदी विजयसिंह देशमुख यांची निवड करण्याची मागणी करण्यात आली.त्यानंतर अवघ्या काही तासात दीपक पवारांच्या जागेवर देशमुखांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे पक्षात सरळसरळ दोन गट निर्माण झाले आहेत.
पोटनिवडणुकीत आ.प्रशांत परिचारक , दामाजी शुगर्सचे चेअरमन आवताडे,शैला गोडसे आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, मनसेचे दिलीप धोत्रे , dvp चे अभिजीत पाटील यांचे तगडे आव्हान भगीरथ भालके यांच्या समोर आहे.
भगीरथ भालके यांना विठ्ठल परिवार ,भालके गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच मित्रपक्षांना देखील सोबत घेऊन पोटनिवडणुकीत गट राखायचा आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर पक्षाची पडझड भालकेंना परवडणारी नाही.
कासेगावाची विजयसिंह देशमुख हे मोठे प्रस्थ आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये त्यांनी वेगळी वाट धरली होती.
यावरून ये विठ्ठल परिवारात अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू होती. मागील आठवड्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली खदखद मांडण्याची तयारी देखील केली होती. मात्र अचानकपणे ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांची समजूत काढल्याची चर्चा सुरू झाली.
आज अचानक आज विजयसिंह देशमुख यांना निवडीचे पत्र देण्यात आले. त्यांनतर पक्षाच्या अडचणीच्या काळात सोबत राहिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पायाखालीची जमीनच सरकली.
एकनिष्ठेचे फळ अचानकपणे पदावरून पायउतार करून मिळाल्याने अनेक पदाधिकारी सामुहीक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. आम्ही काय गुन्हा केला हे तरी सांगायचे अशी मागणी आता होऊ लागलीय.
तालुकाध्यक्ष पदाची धुरा देशमुखांच्या खांद्यावर आल्याने देशमुखांच्या निवडीच्या पक्षाला फायदा होतो की नुकसान हे आता काळच ठरवेल.
बहुजन, दलित, अल्पसंख्याक समाजाला घेऊन राजकारण-समाजकारण करण्याचे कसब स्व.आमदार भारत भालके यांच्याकडे होते. ते आता विठ्ठल परिवाराला जमणार का ? हीच चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
स्थानिक पदाधिकारी यांच्यात कसलीही चर्चा नाहीच :दिपक पवार
जनसंवाद यात्रे वरूनच राष्ट्रवादीत विसंवाद
विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांनी पंढरपूर मंगळवेढा येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले आहे.
असं पत्रिकेमध्ये नमूद केलेले होते.
परंतु स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्याशी याबाबत कसलेही विचारात तर घेतलेच नाही उलट त्याच पत्रिकेमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नाव प्रमुख उपस्थिती मध्ये घेतलेले होते.
यावरून राष्ट्रवादीतच या जनसंवाद यात्रेमध्ये विसंवाद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी दिली होती.
आता ते नेते भाजपातून राष्ट्रवादीत आलेले आहेत की भाजपच महाविकास आघाडीत आलेली आहे हे त्यांनी व भगिरथ भालके यांनी स्पष्ट केले पाहिजे असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
जनसंवाद यात्रेसंदर्भात पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही प्रमुख पदाधिका-यांशी भगिरथ भालके यांनी चर्चा केलेली नाही तेंव्हा प्रथम त्यांनी स्वपक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधावा.
आदरणीय स्व.भारतनानांच्या जयंतीनिमित्त या जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले होते. व स्व.भारतनाना यांनी कधीही सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ तुटू दिली नाही म्हणुनच ते लोकनेते होते किमान त्यांच्या जंयतीदिनी तरी कार्यकर्त्यांचा अनादर होऊ नये.अशी प्रतिक्रिया दीपक पवार यांनी दिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये ज्या कार्यकर्ते व पदाधिका-यांनी स्वतःच्या स्वार्थाचा व अडचणींचा विचार न करता पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन पक्ष सत्तेवर येण्यासाठी अतिशय मजबूत अशी लढाई केली व पक्ष तालुक्यातील घराघरात पोहचविला त्यांना विश्वासात न घेता भाजपच्या नेत्याचे नाव महाविकास आघाडीच्या पत्रिकेमध्ये घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचंड नाराज झालेले होते.
पंढरपुर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना विचारात न घेता कोणी गृहीत धरणार असाल तर ते कदापी सहन केले जाणार नाही. असा इशाराही दीपक पवार यांनी त्यावेळी दिला होता
सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750