राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘जोहार’
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘जोहार’
काल दिनांक २५ जुलै २०२२ ला राष्ट्रपती पदाची शपथ घेताना मा.द्रौपदी मुर्मू यांनी जोहार हा शब्द वापरून अभिवादन केले. हा शब्द त्यांच्या तोंडून ऐकताच देशातील करोडो आदिवासींच्या भुवया उंचावल्या.असंख्य गैरआदिवासींनी तर हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. काय होतो या शब्दाचा अर्थ!
माझ्या माहितीनुसार राजस्थानमधील भिल्ल आणि मध्य भारतातील ‘संथाल, मुंडा, ओरॉन, बिरहोर, हो, खारीया’ इत्यादी जमाती अभिवादनासाठी जोहार हा शब्द वापरतात. मध्य प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर गोंड जमात राहते. परंतु ही जमात जोहारऐवजी ‘जय सेवा’ असा शब्द वापरते. भिल्ल जमात सेवा जोहार असा पण शब्द वापरते.
जोहार या शब्दाचे दोन संदर्भ आहेत.एक राजपुतांच्या स्त्रीयांनी आग्नीप्रवेश करून आत्मबलीदान केले त्यास जोहार असे म्हणत. हा जोहार आपला राजा आणि यजमान युद्धात मारल्या गेल्यावर त्यांच्या स्त्रीया आत्मदहन करत होत्या. त्यास जोहार म्हणत होते. एकाच वेळी २४ हजार स्त्रियांनी आत्मदहन केल्याची नोंद आहे.
दुसरा संदर्भ आहे अभिवादन करण्याची पद्धत! यादवकालीन महाराष्ट्रात मराठी साहित्यात ‘जुहारणे’ हे क्रियापद प्रचलित होते. त्याचा अर्थ वंदन करणे असा आहे. परंतु हा जोहार केवळ खालच्या जातीतील लोकच करत होत्या. म्हणून त्याचा सरळ अर्थ हा आहे की जोहार हा शब्द खालच्या जातीचे शूद्रत्व दर्शविणारा आहे. एकनाथांचा एक भारूड आहे. ‘जोहार मायबाप जोहार! मी सकळ संतांचा महार। म्हणूनच शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या काळात जोहार म्हणण्यावर बंदी आणली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तर हा शब्द वापरायचाच नाही असा संदेश सर्व मागासवर्गीयांना दिला आणि ही अभिवादनाची प्रथा महाराष्ट्रातून नामशेष झाली.
महाराष्ट्राच्याबाहेर इतर राज्यात प्रभावी आदिवासी नेते झाले नाहीत. त्याचबरोबर हिंदू समाज व्यवस्था ही वर्णव्यवस्थेच्या उतरंडीवर उभी आहे. या व्यवस्थेने प्रत्येक जातीसाठी काही सामाजिक नियम घालून दिले. काही प्रथा परंपरा घालून दिल्या.या सर्व गोष्टींचा अभ्यास आदिवासी नेत्यांनी केला नाही. त्या अनुषंगाने त्यांनी आदिवासी समाजाचे प्रबोधनही केले नाही. आजही करत नाही. म्हणून ब-याच अनिष्ठ प्रथा आदिवासीत अजून रूढ आहेत. जोहार ही त्यापैकी अशीच अभिवादनाची एक प्रथा आहे. खरे म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जोहार हे अभिवादन या शब्दामागचा अर्थ माहित नसल्यामुळेच वापरले असावे. हा शब्द कुण्याही आदिवासी जमातीने वापरू नये. तसेच हा शब्द केवळ जुना आहे म्हणून काही आदिवासी या शब्दाभोवती कपोलकल्पित अर्थ गुंफत आहेत. हासुद्धा ‘अव्यापारेशू व्यापार’ आदिवासींनी करू नये.