रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट

मुंबई, दि. २४ : राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कानील कार्य केंद्राने कळविले आहे.
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला दि. २४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० पासून ते दि. २६ जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असून सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील गोमणी येथे कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात ग्रामसेवक उमेश धोडरे अडकले असता, पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
मुंबई शहर आणि उपनगर यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातून अनुक्रमे २०४३.७४, २११८.९५ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
20250724 State Situation Report
००००