‘रानभाजी महोत्सवा’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
Summary
औरंगाबाद दि.14 (जिमाका)- पावसाळ्यात हमखास येणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने सुरु असून आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले असून रानभाज्या बनविण्याच्या पाककृतीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र,पैठण रोड […]
औरंगाबाद दि.14 (जिमाका)- पावसाळ्यात हमखास येणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने सुरु असून आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले असून रानभाज्या बनविण्याच्या पाककृतीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र,पैठण रोड येथे रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, प्रकल्प संचालक बी .एस तौर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. किशोर झाडे ,कृषी उपसंचालक दिवटे यांच्यासह विविध शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची प्रतिनिधी, महिला उपस्थित होत्या.
या प्रदर्शनात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले व विक्रीसाठीही रानभाज्या उपलब्ध होत्या. सुरण, टाकळा,पाथरी, भुईआवळी, कपाळफोडी, तरोटा, उंबर, चिगुर, सराटे, घोळ भाजी, केना, शेवगा, कर्टुली इ. रानभाज्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचेही प्रदर्शन, तयार करण्याची पाककृतीही सादर करण्यात आली. या महोत्सवात शेतकरी महिला, बचतगट , शेतकरी गट त्याचप्रमाणे व्यक्तिगत शेतकरीही सहभागी झाले होते.
पावसाळ्यात शेतामध्ये अथवा जंगलात, डोंगर-रानावर उगवणाऱ्या विविध भाज्या,वनस्पती ह्या आरोग्यासाठी पौष्टिक असून या भाज्यांचा आहारात समावेश व्हावा तसेच नव्या पिढीला रानभाज्याची ओळख व्हावी, यासाठी कृषी विभाग ‘आत्मा’, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
00000