रात्रीच्या अंधारात रेती चोरीचा डाव फसला – खैरलांजी शिवारात पोलिसांची धडक कारवाई
तुमसर तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक भूमिका घेतल्याचे चित्र समोर आले आहे. रात्रीच्या शांततेचा फायदा घेत शासनाच्या मालमत्तेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणारा तरुण ट्रॅक्टर चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
दि. 24 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 1.15 वाजताच्या सुमारास, खैरलांजी शिवारातील डोंगरालगत नाल्याजवळ अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन तुमसरच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली.
छाप्यादरम्यान आरोपी प्रणय अजय रंगारी (वय 19 वर्ष, रा. मोहगाव खदान, ता. तुमसर, जि. भंडारा) हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये शासन अधिकार क्षेत्रातील रेती भरून वाहतूक करताना आढळून आला. विशेष म्हणजे, त्याच्याकडे कोणताही वैध रेती वाहतूक परवाना नव्हता.
पोलिसांनी घटनास्थळीच निळ्या-पांढऱ्या रंगाचा स्वराज 735 कंपनीचा ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.-36 टीसी-68) व विना क्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॉली जप्त केली. या वाहनांची किंमत अंदाजे 8 लाख रुपये असून, ट्रॉलीमध्ये सुमारे 1 ब्रास रेती आढळून आली, ज्याची किंमत अंदाजे 6 हजार रुपये आहे. एकूण 8 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रविण बाबाराव पाटील (वय 43, नेमणूक – स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा) यांच्या लेखी तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा क्रमांक 812/2025 नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर शहारे करत असून, रेती चोरीमागे आणखी कुणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
रेती चोरीसारख्या पर्यावरणविरोधी गुन्ह्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.
