महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक- राज्यपाल रमेश बैस

Summary

मुंबई, दि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस […]

मुंबई, दि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले व प्रशिक्षित असे आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे आयोजित अग्निसेवा सप्ताह तसेच अग्निसेवा दिनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते मुंबई फायर ब्रिगेड तसेच राज्य अग्निशमन सेवेतील 13 अधिकाऱ्यांना व जवानांना ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदके’ प्रदान करण्यात आली, तसेच अग्निशमन कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

            एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली, त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ 10-12 लाख होती. आज शहराची लोकसंख्या किमान पंधरा पटीने वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या आज अनेक देशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शहराला सशक्त व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्निशमन दल असणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

 सोसायटी व उद्योगांचे नियमित ‘फायर ऑडिट’ करण्याची सूचना

            मुंबईसारख्या शहरांमध्ये आगीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांना तसेच गृहनिर्माण संस्थांना सहभागी केले पाहिजे तसेच गृहनिर्माण संस्था व उद्योग संस्थांचे नियमित ‘फायर ऑडिट’ केले गेले पाहिजेत असेही राज्यपालांनी सांगितले.

 अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला योगदान देण्याचे राज्यपालांचे आवाहन

            समाजाच्या विकासामध्ये अग्निशमन सेवा दलाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून राज्यपालांनी राज्यातील नागरिकांना अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधीला अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले. या निधीचा उपयोग अग्निशमन सेवा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी करण्यात येतो. 

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांचेसह देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगर पालिका, प्रशांत रणपिसे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका, किरण गावडे, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, यशवंत जाधव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, कैलास हिवराळे, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई अग्निशमन दल, विजयकुमार पाणिग्रही, माजी उपमुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई अग्निशमन दल, संजय पवार, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, नाशिक, धर्मराज नाकोड,सहायक स्टेशन अधिकारी, नागपूर महानगरपालिका, राजाराम केदारी, लिडिंग फायरमन, पुणे महानगरपालिका, सुरेश पाटील, लिडिंग फायरमन, मुंबई अग्निशमन दल, संजय म्हामुणकर, लिडिंग फायरमन मुंबई फायर ब्रिगेड व चंद्रकांत आनंददास, फायरमन, पुणे महानगरपालिका यांचा ‘राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक’ देऊन सत्कार करण्यात आला.

            सुरुवातीला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखावर अग्निशमन सेवा चिन्ह अंकित केले. त्यानंतर राज्यपालांनी अग्निशमन कर्मचारी कल्याण निधीला आपले योगदान देऊन अग्निशमन सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन केले.  मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *