राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद
मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 23,179 नवीन संसर्गाच्या घटना घडल्या असून यामुळे 84 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त कोरोना रूग्णांची नोंद नागपूर, मुंबई आणि पुण्यात करण्यात आली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 53,080 लोकांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात बुधवारी दिवसभरात 2587 रुग्ण वाढले आहेत तर दिवसभरात 769 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात करोनाबाधीत 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून 425 रुग्ण क्रिटिकल आहेत.
लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी कोरोना लसीचे 2.20 कोटी डोस केंद्र सरकारकडे मागवले गेले आहेत. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहिले असून दर आठवड्याला 20 लाख डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत अशी मागणी केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस देण्यासाठी तातडीने परवानगी देण्याची मागणी केल्याचं कळतंय.
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991