महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

Summary

मुंबई | प्रतिनिधी लोकशाहीच्या उत्सवासाठी राज्य सज्ज झाले असून, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना निर्भयपणे आणि उत्साहाने मतदान करता यावे, यासाठी राज्य शासनाने त्या दिवशी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात सार्वजनिक […]

मुंबई | प्रतिनिधी
लोकशाहीच्या उत्सवासाठी राज्य सज्ज झाले असून, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना निर्भयपणे आणि उत्साहाने मतदान करता यावे, यासाठी राज्य शासनाने त्या दिवशी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना राज्य शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या अधिसूचनेनुसार, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व आस्थापना यांना ही सुट्टी लागू राहणार आहे. विशेष म्हणजे, मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, महानगरपालिका क्षेत्रातील केंद्रशासनाची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सुट्टी लागू असेल, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही मतदार कामाच्या कारणामुळे मतदानापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.
या महानगरपालिकांमध्ये सार्वजनिक सुट्टी
सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये
बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.
प्रशासनाचे आवाहन
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही कारणाने मतदान टाळू नये, लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
१५ जानेवारी हा केवळ सुट्टीचा दिवस नसून, तो लोकशाहीच्या भवितव्यासाठी निर्णयाचा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावून सक्षम, जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासन घडविण्यात आपला वाटा उचलावा, असे मत व्यक्त केले जात आहे.

संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *