*राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची तळमळ* *रखरखत्या उन्हात पायी फिरुन केली कामांची पाहणी* *शेतातील बांधावर जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या*

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.25, सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते, शिवार रस्ते यासोबतच सिंचनाची जास्तीत जास्त कामे व्हावीत तसेच तालुक्यात सुरू असलेली सिंचनाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आग्रही असून गेल्या तीन दिवसांपासून रखरखत्या उन्हात 4 ते 5 किमी पायी चालून वेळ प्रसंगी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून दुचाकीवर स्वार होवून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यात दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी तालुक्यात सुरू असलेली सिंचनाची कामे, प्रलंबित व नव्याने सुरू करावयाची सिंचन तसेच रस्त्यांची कामांची पाहणी करून परिसरातील शेतवस्तीत राहणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.
सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच गावातील शिवार व पानंद रस्त्यांना रोजगार हमी ची जोड देऊन मतदारसंघातील रस्ते विकासासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासनास पाठपुरावा करून मंत्रालय तसेच औरंगाबाद येथे संबंधीत विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मतदार संघात यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी तालुक्यातील दिडगाव, उपळी, सावखेडा, आमठाणा, धावडा, अंभई, नानेगाव इत्यादी गावांत याबाबत प्रत्यक्ष भेट देवून माहिती दिली. गाव शिवारात नव्याने करावयाची सिंचन तसेच रस्ता दुरुस्ती, रुंदीकरण, मजबुतीकरण याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
सदरील कामांची पाहणी करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट दिली. यावेळी रखरखत्या उन्हात तसेच नांगरलेल्या शेतातून मार्ग काढत त्यांनी पायी फिरून पाहणी केली. सिंचनाची कामे सुरू असलेल्या भागात विविध ठिकाणच्या विहिरींच्या पाणी पातळीची त्यांनी पाहणी केली .आज या विहिरीतील पाणी तळाला लागले आहे. जवळच सुरू असलेली सिंचनाची कामे आता पूर्ण होईल त्यानंतर मे महिन्यातही याच विहिरींना मुबलक पाणी असेल अशा शब्दांत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंचनाचे महत्व पटवून दिले. रस्ते आणि पाणी हे ग्राम विकासाचे प्रमुख साधन असल्याने गावकऱ्यांनी सर्व वादविवाद बाजूला सारून यासाठी स्वतःहुन सहभाग घेत शासकीय यंत्रनेस सहकार्य केले पाहिजे असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार याप्रसंगी म्हणाले.
————————————-
डोक्याला पांढरा रुमाल , तोंडाला मास्क आणि …..
डोक्याला पांढरा रुमाल, तोंडाला मास्क आणि सोबत दोन – तीन अधिकारी आणि सुरक्षा रक्षक भर उन्हात येताना पाहून शेतात राहणारे शेतकरी स्तब्ध राहून गेले. आपल्या समस्या व रस्ताची अडचण सोडवण्यासाठी मंत्री शेतात आले हे लक्षात येताच या शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन अत्यंत तळमळीने या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या. काही मोजक्या लोकांनाच राज्यमंत्री अब्दुल सत्तार गावातील शेत शिवारात येणार असल्याची माहिती होती. त्यानंतर मात्र चर्चेला एकच उधाण आले.