औद्योगिक औरंगाबाद महाराष्ट्र रोजगार हेडलाइन

युवकांना रोजगार व महानगरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

Summary

औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने ‘इंडस्ट्रियल मीट’ला प्रतिसाद औरंगाबाद, दि. 18 (विमाका) केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत झालेल्या ‘इंडस्ट्रियल मीट’च्या माध्यमातून 250 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. युवकांना रोजगार देण्यासोबतच […]

औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने ‘इंडस्ट्रियल मीट’ला प्रतिसाद

औरंगाबाद, दि. 18 (विमाका) केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत झालेल्या ‘इंडस्ट्रियल मीट’च्या माध्यमातून 250 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. युवकांना रोजगार देण्यासोबतच आपल्या महानगरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी केले.

चिकलठाणा एमआयडीसी येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित  औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने ‘इंडस्ट्रियल मीट’कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन, मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील, लघू उद्योग भारतीचे अध्यक्ष रविंद्र वैद्य, माजी महापौर बापू घडामोडे, सहायक आयुक्तज संपत चाटे, उपायुक्त सु.द. सैंदाणे उपस्थित होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.

केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, आपल्या महानगरात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण आहे. उद्योगांना पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे सहकार्य असेल. केंद्र व राज्य शासन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवक, युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच आवश्यक प्रशिक्षण, कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन, बॅंकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्धतता याबाबतही आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी उद्योग क्षेत्रात काम वाढवावे लागणार आहे. 2047 ला आपला देश विकसीत राष्ट्र तसेच विश्वगुरू व्हावा, यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचा उल्लेख डॉ. कराड यांनी केला.

५ लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही ऑनलाईन मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योजक आणि उमेदवार एकाच व्यासपीठावर

नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात, त्यापैकी उद्योजक व नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने उद्योजकांकडील रिक्त पदासाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. 

250 सामंजस्य करार

राज्यातील बेरोजगार उमेदवारांना अधिक रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे मार्फत 16 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यपाल,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्री यांचे उपस्थितीत नामांकित 44 इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत तसेच, 20 एप्रिल 2023 रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री, अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व आयुक्त यांच्या उपस्थितीत 16 उद्योजक व प्लेसमेंट एजन्सीज समवेत सुमारे 1 लक्ष 35 हजार नोकऱ्या या उपलब्ध करुन देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. तसेच 9 जून 2023 रोजी पुणे येथे राज्यपाल महोदय तसेच कौशल्य विकास मंत्री यांचे उपस्थितीत 141 नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत सामंजस्य् करार केलेले असुन याद्वारे 1 लाखापेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच 15 जुलै 2023 रोजी ठाणे येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय यांचे उपस्थितीत नामांकित 289 इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत सामंजस्य करार केलेले आहेत. अशा एकूण 490 सामंजस्य करारनाम्याद्वारे सुमारे 4.49 लक्ष रोजगार उपलब्ध होणार आहेत.

आज 250 कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आले असून यातून युवक, युवतींना रोजगार मिळणार आहे. औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने आयोजिज इंडस्ट्रियल मीटमध्ये इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज यांनी आज अखेर शासनासमवेत सामंजस्य करार केले आहेत.

यावेळी औद्योगिक आस्थापना, प्रतिनिधी, औद्योगिक संघटना प्रतिनिधी, प्लेसमेंट एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *