BREAKING NEWS:
महाराष्ट्र यवतमाळ हेडलाइन

यवतमाळ जिल्ह्यातील पहिल्या डिजिटल सरकारी शाळेचे लोकार्पण

Summary

यवतमाळ दि.8 : मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरातील खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या डिजिटल सुविधा मिळतात. त्या पद्धतीची सुविधा आता दारव्हा शहरातील मराठी शाळेत उपलब्ध झाली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकलपनेतून निर्माण करण्यात आलेल्या शहरातील नगरपरिषदेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा […]

यवतमाळ दि.8 : मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरातील खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या डिजिटल सुविधा मिळतात. त्या पद्धतीची सुविधा आता दारव्हा शहरातील मराठी शाळेत उपलब्ध झाली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकलपनेतून निर्माण करण्यात आलेल्या शहरातील नगरपरिषदेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एकमधील डिजिटल क्लासरूम व इंटेरिअर वर्कचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले.

दारव्ह्यातील ही शाळा जिल्ह्यातली पहिलीच डिजिटल सरकारी शाळा असून  या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना महागड्या खाजगी शाळेसारख्या डिजिटल सुविधा मिळणार आहे.

या शाळेत एकूण चार वर्गखोल्या असून दीडशेहून अधिक विद्यार्थी पटसंख्या आहे. या शाळेच्या वर्गखोल्यात प्रत्येकी २० संगणक बसविण्यात आले आहेत.  त्यावर एकाच वेळेला चार विद्यार्थी लिहू शकतात. तसेच प्रत्येक वर्गखोलीत डिजिटल फळा बसवण्यात आला असून या सर्वांना इंटरनेटची जोडणी देण्यात आली आहे.

याशिवाय शाळेच्या इमारतीच्या भिंती नव्या तऱ्हेने निर्मित केलेल्या आहेत. या सर्व सोयीसुविधांसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा नगरपरिषदेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार योजनेमधून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.

पालकमंत्री बनले शिक्षक आणि विद्यार्थी

दारव्यातच नव्हे तर जिल्ह्यात पहिल्यांदा डिजिटल सरकारी शाळेची निर्मिती झाल्याने पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीला शिक्षक होऊन अनेकांचा क्लास घेतला तर विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा पाहून स्वतः विद्यार्थी म्हणून बाकांवर बसून डिजिटल सुविधेचा लाभ घेतला.

या डिजिटल शाळेच्या लोकार्पणप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, श्रीधर मोहोड, कालींदा पवार मनोज सिंगी, राजू दुधे, दामोदर लढा आरिफ काझी, विकास जाधव, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

“सार्वजनिक विकास करताना मूलभूत सुविधांप्रमाणे शाळातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार सुविधा पुरविणे विकासातील एक घटक आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे पालकमंत्री म्हणून शाळांचा विकास करण्याचा पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना लवकरच टॅब देण्याची भूमिका आमची आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकच झाले पाहिजे या भूमिकेतून काम करत आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, नगर परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प केला आहे,” असे पालकमंत्री संजय राठोड यांनी डिजिटल शाळेच्या लोकार्पण प्रसंगी सांगितले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *