मोहाडी पंचायत समिती सभापतीच्या अविश्वास ठरावावर १८ ऑगस्टला चर्चा
मोहाडी:- पंचायत समिती मोहाडीचे सभापती रितेश वासनिक यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठरावावर दिनांक १८ ऑगस्टला चर्चा होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक ९ ऑगस्टला याबाबतचे पत्र दिले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम ७२ पोट कलम २ नुसार प्रीती कैलास शेंडे व इतर १० सदस्य पंचायत समिती मोहाडी यांनी मोहाडीचे सभापती पंचायत समिती मोहाडी यांचे विरुद्ध अविश्वास ठरावाची नोटीस जिल्हाधिकारी यांचे समक्ष दिनांक ०७ ऑगस्टला दाखल केली होती. त्यानुसार सभापती पंचायत समिती मोहाडी यांचे वरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा दिनांक १८ ऑगस्टला दुपारी ०२:०० वाजता पंचायत समिती कार्यालय मोहाडी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांच्यावर अविश्वास दाखवत १२ पंचायत समिती सदस्यांनी दिनांक ०७ ऑगस्टला जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव बाबत अर्ज दाखल केला. यात ११ पंचायत समिती सदस्यांनी सह्या केल्या असून एक सदस्याचे समर्थन आहे. यानंतर १२ पंचायत समिती सदस्य देवदर्शनाला गेल्याची माहिती आहे. १४ पंचायत समिती सदस्य असलेल्या मोहाडी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे ८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य निवडून आले होते. सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव होते. मात्र भाजपच्या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अनुसूचित जातीचे एकही उमेदवार नसल्याने राष्ट्रवादी पक्षाला सभापती पदाचा लाभ मिळाला. मात्र सुरुवातीपासून सभापती पद हा कायम वादाचा विषय राहिला. प्रीती शेंडे ह्या जांभोरा क्षेत्रातून राखीव गटातून निवडून आल्या होत्या. तर रितेश वासनिक हे खुल्या गटातून निवडून आले होते. अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातून निवडून आल्याने प्रीती शेंडे ह्या सभापती बनतील अशी अनेकांची इच्छा होती. यावेळी आमदार राजू कारेमोरे यांचे जवळीक असलेले रितेश वासनिक यांची सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यावेळी सुद्धा एक गट नाराज होऊन राष्ट्रवादीच्या अनेकांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी सभापती पद सव्वा सव्वा वर्षासाठी ठरले असल्याचे बोलले जात होते. आता राज्याचे पडसाद मोहाडी तालुक्यातही उमटत असून शरद पवार गट सक्रिय होऊन त्यातून सदर प्रकार घडत आहे. तर विद्यमान सभापती रितेश वासनिक कार्य प्रणालीवर नाराजीतून अविश्वास आणण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटी बाबत आमदार राजू कारेमोरे यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. दिनांक १८ ऑगस्टला होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या चर्चेवर काय निर्णय होते, याकडे मोहाडी वासियांचे लक्ष लागले आहे.