मोहाडी पंचायत समिती सभापती वरील अविश्वास प्रस्ताव बारडला; विश्वास समर्थनात ९ तर विरोधात ३ सदस्य; परिसराला पोलीस छावणीचे रूप; बाउन्सर ची उपस्थिती चर्चेचा विषय; पोलीस अधीक्षकासह २५० पोलिसांच्या बंदोबस्त
मोहाडी:-
पंचायत समिती मोहाडी येथील विद्यमान सभापती रितेश वासनिक यांच्यावरील दाखल अविश्वास ठराव तूर्तास बारडला आहे. राष्ट्रवादी पक्षात दोन गट झाल्याने सदर अविश्वास ठराव तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात चर्चेचा विषय बनला होता. पंचायत समिती मोहाडी १४ सदस्य संख्या असल्याने अविश्वास ठरावावर दहा सदस्यांचे समर्थन आवश्यक होते. मात्र अविश्वास ठरावाच्या बाजूने केवळ नऊ लोकांनी समर्थन दिल्याने रितेश वासनिक सभापती पदावर कायम आहेत. यावेळी पंचायत समिती परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून आला. एकंदरीत लागलेल्या निकालातून आमदार राजू कारेमोरे यांचे वरील विश्वास कायम असल्याचे बोलले जात आहे.
मोहाडी पंचायत समिती सभापती रितेश वासनिक यांच्यावर अविश्वास दाखवत १२ पंचायत समिती सदस्यांनी दिनांक ०७ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावाचे पत्र दिले. तेव्हापासून बारा सदस्य गुप्त ठिकाणी निघून गेले. राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्याने सदर विषय जिल्हाभरात चर्चेचा बनला. विद्यमान सभापती हे आमदार राजू कारेमोरे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे रितेश वासनिक कायम राहावे यासाठी आमदार राजू कारेमोरे यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. बाहेर गेलेल्या पंचायत समिती सदस्यांना वीप जारी करण्यात आला. दिनांक १८ ऑगस्टला पंचायत समिती मोहाडी येथे अविश्वास ठरावाच्या सभेकरिता प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली होती. पोलिसांकडूनही कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.
पंचायत समितीला चारही बाजूने घेरले गेले होते. कुणालाही आज जाण्याची परवानगी नव्हती. दुपारी दीड वाजताच्या दरम्यान गुप्त ठिकाणी निघून गेलेले बारा पंचायत समिती सदस्य पंचायत समिती परिसरात दाखल झाले. त्यावेळी रितेश वासनिक सह इतर पंचायत समितीचेही सदस्य उपस्थित होते. त्यावेळी विरोधक व समर्थक यामध्ये बाचा बाची ही झाली. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण शांत झाले. यानंतर बारापैकी ९ सदस्य पंचायत समितीच्या आत गेले व तीन बाहेर राहिले. अविश्वास ठरावाच्या सभेला सुरुवात झाली. मात्र तीन पैकी पुन्हा एक सदस्य आत गेला. त्यामुळे निर्णय कोणाच्या बाजूने लागते. याबाबत हे सांगणे कठीण होते. दोन्ही गटाच्या लोकांच्या मनात धडकी भरली होती. परिसरात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. काय निर्णय झाले हे एकमेकांना विचारणे सुरू होते. एवढ्यात तर अविश्वास ठराव बारडल्याची माहिती बाहेर आली. अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ ९ पंचायत समिती सदस्यांनी तर विरोधात ४ पंचायत समिती सदस्यांनी हात दाखवून सहभाग होकार दिला.
मोहाडी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित अविश्वास ठरावाच्या सभेच्या पिठाची अधिकारी म्हणून तुमसर उपविभागीय अधिकारी बाळासाहेब टेळे तर सभेचे सचिव गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर व बी. आर. भोयर विस्तार अधिकारी यांनी काम पाहिले. त्यावेळी सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, माजी सरपंच संजय मीरासे, तुमसर तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य आनंद मल्लेवार व महादेव पचघरे, अनिता नळगोपुलवार, कैलास तितीरमारे, चेतन ठाकूर, केशव बांते, रवी माकडे, विलास ठोंबरे, सागर गभने, यासीन छवारे, अरविंद येळणे, हैशोक शरणात, मनोज वासनिक, योगेश सिंगनजुडे, कैलास बनसोड, सुभाष गायधने, मुरली गायधने, सचिन पटले, सेवक चिंधालोरे, यादव कुंभारे, भूषण गभने, पवन चव्हाण, श्वेताताई येळणे, आकांक्षा वासनिक, निखिल खोब्रागडे, रवी लांजेवार, विनोद साठवणे, मुरलीधर ढबाले, रामचंद्र मेश्राम, राजेश हटवार, अतुल भोवते, महेश कळंबे, आधी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
बाऊन्सर ची उपस्थिती:-
अविश्वास ठरावासाठी प्रशासनाप्रमाणे राजकीय मंडळींनी तयारी केली होती. कुठलाही वाद निर्माण झाल्यास बचाव म्हणून ह्या राजकीय मंडळींनी बाउन्सरलाही सोबत आणले होते. यावेळी २५० पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त असताना मोहाडी पंचायत समिती परिसरात बाउन्सरला बोलविण्यात आल्याने पोलीस प्रशासनावर विश्वास नाही का?
अविश्वासा वेळी परिसरात बाउन्सरची उपस्थिती हा एक चर्चेचा विषय होता.
ह्या सदस्यांचा सहभाग अविश्वास ठरावाच्या सभेत १४ पैकी १२ सदस्यांनी सहभाग घेतला. यात अविश्वास ठरावाच्या समर्थनात ९ सदस्यांनी होकार दिला. त्यात प्रीती शेंडे, विठ्ठल मरलेवार, रेवानंद चकोले, विष्मा सेलोकर, छाया तडस, कौतिका मंडलेकर, दुर्गा बुराडे, जगदीश शेंडे, कैलास झंजाळ तर विरोधात रितेश वासनिक, बाणा सव्वालाखे यांनी हात वर केले. कोणत्याही बाजूने मत न देता वंदना राजू सोयाम ह्या तटस्थ राहिल्या तर अशा सतीश बोंद्रे, उमेश मधुकर भोंगाडे हे सभेला अनुपस्थित राहिले.
आमदार राजू कारेमोरे यांच्यावर विश्वास कायम:- विद्यमान सभापती रितेश वासनिक यांच्यावर अविश्वास ठराव पारित व्हावा यासाठी शरद पवार गटाने पुरेपूर प्रयत्न केले. बाराही पंचायत समिती सदस्यांना दहा दिवस अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवले. मात्र जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहेर गेलेले चार सदस्य परत आले. यापैकी सभापती पदासाठी इच्छुक उमेदवाराला सोडून तीन पंचायत समिती सदस्यांनी आमदार राजू कारेमोरे यांच्यावर विश्वास कायम ठेवीत अविश्वास ठरावाला समर्थन दिले नाही. विरोधकांचा आरोप ज्यावेळेस बाराही सदस्य बाहेरून पंचायत समितीच्या प्रांगणात आले त्यावेळेस त्यांना काही काळ बाहेर थांबविण्यात आले होते. शिवाय सभेच्या कामकाजाला ०२:०० वाजता सुरुवात होणार होती. मात्र एक तास जाणीवपूर्वक उशीर करण्यात आला असा आरोप विरोधकांनी केला आहे.