मोठ्या प्रमाणावर लसीकरणामुळे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात व मृत्यू दर कमी ठेवण्यात यश – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील लम्पी चर्मरोगाने प्रभावीत क्षेत्रात केलेल्या लसीकरणाची टक्केवारी 94 टक्के
Summary
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 3 लाख 24 हजार पशुधन असून 2 लाख 61 हजार 546 पशुधनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी 82 टक्के असून लम्पी चर्मरोगाने प्रभावीत क्षेत्रात केलेल्या लसीकरणाची टक्केवारी 94 टक्के आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने प्रादुर्भाव रोखण्यात व पशुधनाचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आल्याचे सांगून जिल्ह्यातील अधिकारी, शासकीय यंत्रणा, वेटरनरी […]
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 3 लाख 24 हजार पशुधन असून 2 लाख 61 हजार 546 पशुधनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी 82 टक्के असून लम्पी चर्मरोगाने प्रभावीत क्षेत्रात केलेल्या लसीकरणाची टक्केवारी 94 टक्के आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने प्रादुर्भाव रोखण्यात व पशुधनाचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आल्याचे सांगून जिल्ह्यातील अधिकारी, शासकीय यंत्रणा, वेटरनरी डॉक्टर, खाजगी वेटरनरी डॉक्टर्स यांनी लसीकरणामध्ये केलेल्या महत्वपूर्ण कामाबद्दल महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
लम्पी चर्मरोगाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, प्रांताधिकारी समिर शिंगटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. नयना देशपांडे आदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील एकूण पशुधन, लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधन, झालेले लसीकरण या सर्वांचा आढावा घेवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, पशुधनाच्या औषधोपचारासाठी औषधांची बँक तयार करा, त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती द्या. महिनाभर पुरेल इतका औषधांचा साठा या औषध बँकमध्ये उपलब्ध ठेवा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्यांची तात्काळ बैठक बोलवावी. ज्या जनावरांना लसीकरण झालेले नाही त्यांना प्रवेशबंदी करावी. शेतकरी अडचणीत सापडलेला असताना सर्व यंत्रणा व संबंधित घटकांनी शेतकऱ्याला मदतीची भूमिका ठेवावी. मुक जनावरांबाबत कोणतीही हयगय नको. सांगली जिल्ह्यातील मेंढपाळांनी चराई क्षेत्राबाबत दिलेल्या निवेदनावर चर्चा करत असताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वन विभागाशी चर्चा करून चराई क्षेत्र ठरवून दिले आहे त्यामुळे मेंढपाळांना कोणतीही अडचण येवू नये. मेंढपाळ पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करीत असून त्यांचा उदरनिर्वाह सर्वस्वी मेंढीपालनावरच आहे ही बाब वनविभागाने लक्षात घ्यावी.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रसार झाला आहे. तथापी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला बाधित पशुधनाचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आले आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 800 पशुधन मृत्यूमुखी पडले आहे. सरकारने याबाबत अनेक उपाययोजना केल्या असून यामध्ये मोफत लसीकरण, मोफत औषधांचा पुरवठा असे निर्णय घेण्यात आले असून ज्या शेतकऱ्यांनी औषधापोटी खर्च केला असेल त्यांच्या खर्चाची परतफेड करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. राज्यात एक हजार वेटरनरी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील ज्या 7 ते 8 हजार खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सेवा या काळात घेण्यात आल्या आहेत त्यांचा मानधनाचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येणार आहे, असे सांगून सांगली, कोल्हापूर महानगरपालिकांच्या क्षेत्रातील मोकाट जनावरांचे लसीकरण करण्यात येत असल्याबद्दलही त्यांनी यंत्रणांचे अभिनंदन केले. जिल्हा व तालुका स्तरावरील संबंधित सर्व यंत्रणांनी फिल्डवर उतरून काम करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाबाबत प्रशासन गांभिर्याने काम करत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या लसीकरणामुळे प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 61 हजाराहून अधिक पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत पशुधनाचे लसीकरण 28 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात एकूण 8 लाख 18 हजार 754 पशुधन असून 153 पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. जिल्ह्यात आजअखेर 297 पशुधन लम्पी चर्मरोगाने बाधित झाले असून 69 पशुधन बरे झाले आहे तर 13 जनावरे मृत झाली आहेत असे सांगितले. बाधित क्षेत्रातील लसीकरण योग्य जनावरांपैकी 94 टक्के पशुधनाचे लसीकरण झाले आहे. मयत 13 जनावरांचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यांना नुकसान भरपाई अदा करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी संपूर्ण जिल्हा नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला असून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून औषध पुरवठ्यासाठी 1 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून 82 लाखाहून अधिक रक्कमेच्या औषध खरेदीला जिल्हा परिषदेला तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे असे सांगितले. यावेळी त्यांनी येत्या दोन – तीन दिवसात संपूर्ण पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची सावळी येथे भेट
लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाची केली पाहणी
संभाजी राजे कोल्ड स्टोरेज सावळी येथे भेट देवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लम्पी चर्मरोगाने बाधित पशुधनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित पशुधनाच्या रक्तचाचण्या, लसीकरण, लसीकरणानंतरही पुन्हा आजाराचा उद्भव, उपलब्ध मनुष्यबळ या सर्वांबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रांताधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार दगडू कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे आदि उपस्थित होते.