क्रीड़ा महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर क्रीडा महोत्सव – केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसूख मांडवीय क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे

Summary

मुंबई दि. 19 : पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशभर राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा भावना आणि ऐक्याच्या या उत्सवात प्रत्येक नागरिकाने किमान एक तास खेळासाठी द्यावा, असे आवाहन केंद्रीय […]

RAJU DONGARE Govt Photographer

मुंबई दि. 19 : पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान देशभर राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा भावना आणि ऐक्याच्या या उत्सवात प्रत्येक नागरिकाने किमान एक तास खेळासाठी द्यावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले आहे.

या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून देशात क्रीडा परिसंस्था उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंत्रालयातून क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, उपसचिव श्री. सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच विविध राज्यांचे क्रीडा मंत्री आणि सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्यात तालुका स्तरावरील तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय क्रीडा मंत्री मांडवीय यांनी सांगितले की, देशात मजबूत स्पोर्ट्स इको सिस्टम निर्माण करून 2036 मध्ये ऑलिंपिकचे यशस्वी आयोजन हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंपर्यंत पोहोचणे, त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या क्रीडा महोत्सवात जिल्हा, विद्यापीठ, महाविद्यालय व स्टेडियम स्तरावर विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये क्रीडा स्पर्धा, वादविवाद व चर्चासत्रे, तज्ज्ञ आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचा सहभाग असणार आहे. योग, बुद्धिबळासारख्या मानसिक खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, ३१ ऑगस्ट रोजी सांगता समारोपादिवशी सायकलिंग उपक्रम देशभर घेण्यात येणार आहे.

खेळ ही केवळ मैदानी मर्यादा नसून आरोग्य, फिटनेस आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. प्रत्येकाने मैदानी खेळ, योगा किंवा सायकलिंगमध्ये सहभाग घेऊन फिट इंडिया चळवळीत योगदान द्यावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘विकसित भारत’ ही संकल्पना साकारण्यासाठी क्रीडा क्षेत्राची मोठी भूमिका आहे, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी अधोरेखित केले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *