‘मॅक्स सिटी VoW साहित्य महोत्सव’ २८-२९ मार्च रोजी
मुंबई, दि. २७ : ‘मॅक्स सिटी VoW लिटरेचर फेस्टिव्हल’ची दुसरी आवृत्ती येत्या २८ व २९ मार्च रोजी मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट आणि होमी भाभा स्टेट यूनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘Between War and Peace: One World, Many Words’ या विषयावर आधारित या महोत्सवात लेखक, अभ्यासक, धोरणनिर्माते तसेच रणनीती व प्रशासन क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येणार आहेत.
हा वैशिष्ट्यपूर्ण साहित्य महोत्सव प्रबल दास गुप्ता, ईका बॅनर्जी, श्रीकांत केसनूर, मंगेश सावंत यांनी ‘MaxCity’च्या माध्यमातून स्थापन केला असून Valley of Words Foundation चे प्रमुख डॉ. संजीव चोप्रा यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला जात आहे. अस्थिर जागतिक परिस्थितीत समकालीन विषयांवरील सार्वजनिक चर्चेचे महत्त्व अधोरेखित करणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. यंदाच्या ‘One World, Many Words’ या संकल्पनेतून वर्तमान आणि भविष्य घडवण्यात विचारांची भूमिका अधोरेखित करण्यात येणार आहे.
डॉ. संजीव चोप्रा म्हणाले, “’One World, Many Words’ ही संकल्पना आजच्या काळाचे अचूक चित्रण करते. आजच्या भू-राजकीय आणि देशांतर्गत घडामोडी समजून घेण्यासाठी विविध दृष्टिकोन आवश्यक आहेत. या महोत्सवात विविध विचारांच्या माध्यमातून जग समजून घेण्याचा प्रयत्न होईल.”
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध पुस्तकांवर चर्चा होणार आहे. तसेच मंगेश सावंत, रवी मिश्रा आणि चैतन्य गिरी हे त्यांच्या अलीकडील पुस्तकांवर संवाद साधणार आहेत.
“मॅक्स सिटी VoW लिटफेस्टमध्ये आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या विविध विषयांवर चर्चा केली जाते,” असे केसनूर यांनी सांगितले.
आजच्या बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारताची जागतिक स्तरावरील भूमिका अधिक बळकट होत आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवातून भारताच्या पर्यायांवर आणि जागतिक व्यवस्थेतील भूमिकेवर विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “आजच्या संघर्षमय जगात पुस्तके, विचार, संवाद आणि चर्चा यांमुळे संघर्षांचे परिणाम आणि त्यामागील कारणे समजून घेण्यास मदत होते, तसेच विविध मतांना स्वीकारण्याची संधी मिळते,” असे प्रबल दास गुप्ता यांनी नमूद केले.
हा साहित्य महोत्सव उदयोन्मुख लेखकांना आपले लेखन सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. तसेच तरुण पिढीत वाचनाची आवड निर्माण करणे आणि चिकित्सक विचारांना चालना देणे हा महोत्सवाचा उद्देश आहे.
0000
