मृत महिलेचे दागिने चोरण्याचा धक्कादायक प्रकार
कोल्हापूर, 3 सप्टेंबर : राज्यासह देशात कोरोना व्हायरस संकटाने आता गंभीर रुप धारण केलं आहे. भारतात पहिला रुग्ण आढळून पाच महिने उलटल्यानंतरही कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात आपल्याला अपयश आलं आहे. एकीकडे ही चिंताजनक स्थिती असतानाच कोल्हापूरमध्ये चिड आणणारी घटना घडली आहे.
कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात घडला आहे. सदर कोरोनाबाधित महिलेचे दागिने चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार लक्षात येताच महिलेच्या नातेवाईकांची पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे, कोरोना रुग्णांना योग्य उपचारच मिळत नसल्याचा घटना समोर आल्याने आरोग्य व्यवस्थेचा गलथानपणा समोर आला आहे. त्यातच मृत महिलेच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासांमध्ये या कारागृहातील तब्बल 40 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल कारागृह प्रशासनाकडे उपलब्ध झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे कळंबा कारागृहातील कोरोना बाधित कैद्यांची संख्या आता 82 इतकी झाली आहे.
कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्याच्या गृहविभागाने सूचना दिल्या होत्या, अनेक कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं पण तरीही कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता ही संख्या 82 वर पोहोचली आहे. दरम्यान अजूनही काही कैदी आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना गंभीर रुप धारण करत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.