आरोग्य नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

मुख्यमंत्र्यांनी केली ‘एनसीआय’ची पाहणी; बाल कर्करुग्णांशी साधला संवाद

Summary

नागपूर, दि. 27 : राष्ट्रीय कर्करोग संस्था (एनसीआय) ही मध्य भारतातील सर्वात मोठी कर्करोगावर उपचार करणारी संस्था ठरली आहे. या संस्थेचा लाभ हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यातील कर्करुग्णांना विशेषत्वाने होणार आहे. या अद्ययावत व बहुमजली इमारतीतील […]

नागपूर, दि. 27 : राष्ट्रीय कर्करोग संस्था (एनसीआय) ही मध्य भारतातील सर्वात मोठी कर्करोगावर उपचार करणारी संस्था ठरली आहे. या संस्थेचा लाभ हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यातील कर्करुग्णांना विशेषत्वाने होणार आहे. या अद्ययावत व बहुमजली इमारतीतील बाल रुग्ण कक्षाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत  बाल कर्करुग्णांशी संवाद साधला.

जामठा परिसरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (एनसीआय) मुख्य इमारतीमध्ये दीपप्रज्वलन करून कोनशिलेचे अनावरण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह व्यापार, उद्योग क्षेत्रातील दिग्गज गौतम अदानी, दिलीप सिंघवी, समीर मेहता, पार्थ जिंदाल, जयप्रकाश रेड्डी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी  बाल कर्करुग्णांच्या कक्षाला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला.

राष्ट्रीय कर्करोग संस्थेचा (एनसीआय) एकूण 25 एकरचा परिसर असून 470  खाटांची व्यवस्था आहे. सध्या या ठिकाणी कर्करोगावर उपचार सुरू आहेत. 18 ऑगस्ट 2012 रोजी या संस्थेच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. 2017 मध्ये पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त उद्योजक रतन टाटा यांच्या हस्ते करण्यात आले. 2018 मध्ये बालकांसाठी 27 खाटांचा स्वतंत्र वॅार्ड सुरू करण्यात आला. त्यानंतर 2019 मध्ये विप्रो कंपनीचे माजी अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी या संस्थेची पाहणी करून कौतुक केले. 2020 मध्ये ‘आयुषमती’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन कर्करोगाविषयीची महिलांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी करण्यात आले होते. आता या संपूर्ण सोईसुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *