नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोंढाळी नगराध्यक्ष योगेश चाफले यांचा भव्य सत्कार कोंढाळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

कोंढाळी | प्रतिनिधी कोंढाळी नगर पंचायतचे पहिले नगराध्यक्ष योगेश शेषराव चाफले यांचा नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या नगराध्यक्ष चाफले यांच्या कार्याची दखल […]

कोंढाळी | प्रतिनिधी
कोंढाळी नगर पंचायतचे पहिले नगराध्यक्ष योगेश शेषराव चाफले यांचा नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या नगराध्यक्ष चाफले यांच्या कार्याची दखल घेत हा सत्कार करण्यात आला असून, कोंढाळीच्या विकासाच्या नव्या पर्वाची ही नांदी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगराध्यक्ष योगेश चाफले यांचे अभिनंदन करताना कोंढाळी नगर पंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन पूर्णतः वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. नगर विकासाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी शासनस्तरावरून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतांच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा सक्षम करणे तसेच जनहितकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही शासनाची प्रमुख प्राथमिकता आहे. कोंढाळी नगर पंचायत ही विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कोंढाळी नगर पंचायतच्या पहिल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या दणदणीत यशाच्या पार्श्वभूमीवर २२ डिसेंबर रोजी राऊतपुरा येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम हगवने व शोभा हगवणे यांच्या वतीने नगराध्यक्ष योगेश चाफले यांचा पारंपरिक पद्धतीने लाडूने तौल करून सत्कार करण्यात आला. या अनोख्या सत्कारामुळे संपूर्ण कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण झाले.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी काटोल पंचायत समितीचे माजी सभापती शेषराव चाफले होते. कार्यक्रमास प्रमोद चाफले, बालकिसन पालीवाल, प्रकाश बारंगे, अन्सार बेग, पवन तिवारी, योगेश गोतमारे, गफ्फार शेख यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष योगेश चाफले यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी नगर पंचायत निश्चितच विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा आशावाद व्यक्त केला. संपूर्ण सत्कार समारंभात उत्साह, जल्लोष आणि विजयाचा आनंददायी माहोल पाहायला मिळाला.

संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *