औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’योजना; गावातच ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज स्वीकारणार, गर्दी करु नका- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

Summary

छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काही अटी व नियम शिथिल केले आहेत. त्यानुसार आता ३१ ऑगस्ट पर्यंत योजनेसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहे, त्यामुळे महिलांनी कागदपत्रे,दाखले मिळविण्यासाठी गर्दी करु नये. सर्व पात्र महिलांना […]

छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काही अटी व नियम शिथिल केले आहेत. त्यानुसार आता ३१ ऑगस्ट पर्यंत योजनेसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहे, त्यामुळे महिलांनी कागदपत्रे,दाखले मिळविण्यासाठी गर्दी करु नये. सर्व पात्र महिलांना लाभ देण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे, महिलांचे अर्ज हे त्यांच्या गावातच स्विकारले जाणार आहेत,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण’ योजना अंमलबजावणी संदर्भात शासनाने काही नियम व अटी बदल केले याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पत्रकारांना संबोधित करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमंद्रे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.  योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज  केला तरीही महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल.लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4.जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेसाठी पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष ऐवजी २१ ते ६५ वर्ष करण्यात आला आहे.परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली.

ते म्हणाले की, अडीच लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

महिलांना कोठेही अर्ज घेऊन जाण्याची गरज नाही. ‘नारी शक्ती दूत’ ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. त्याद्वारे नाव नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी गावातच ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सुपरवायझर, बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामिण यांच्याशी संपर्क साधावा. लाभार्थी स्वतःही मोबाईल ॲप वरुन नाव नोंदणी करु शकता. शहरी भागात वार्ड ऑफिसर, अंगणवाडी सेविका, सुपरवाझर, बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी यांच्याशी संपर्क साधावा,असेही स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, योजनेची माहिती व योजनेसाठी नाव नोंदणी करण्याबाबत गावस्तर, मंडळस्तर ते तालुकास्तर व जिल्हास्तर अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गावागावांत दवंडीद्वारे माहिती पोहोचविण्याच्या सुचना देण्यात येत आहेत. आपल्या गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत अर्ज भरायचे आहेत,असेही त्यांनी सांगितले.  तसेच महिलांना बॅंक खाते उघडण्यासाठी व ते आधार संलग्न करण्यासाठीही सुविधा करण्यात आल्या आहेत. शून्य बॅलन्स आधारीत खाते उघडण्याबाबत बॅंकांना सुचित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांनी तालुका, जिल्हास्तरावर येण्याची व गर्दी करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही दलालांच्या भुलथापांना बळी पडू नका. आपल्या गावातच नोंदणी करता येणार आहे.नोंदणी साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. तरी कोणीही लुबाडणूक करीत असल्यास असे प्रकार तात्काळ निदर्शनास आणावे,असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *