BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Summary

भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया! मुंबई, दि. २५ :- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. […]

भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया!

मुंबई, दि. २५ :- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वातंत्र्य संग्रामातील वीर हुतात्म्यांना विनम्र अभिवादन तसेच थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या परिवारांप्रति कृतज्ज्ञता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ‘आज भारत जगातील एक सशक्त आणि सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारे राष्ट्र आहे. विविधतेने नटलेला खंडप्राय भारत जगासाठी कुतुहलाचा विषय आहे. भारतातील आघाडीचे राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राविषयीही जगभरात मोठी उत्सुकता आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत आपल्या महाराष्ट्रानेही मोठे योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीच्या आलेखात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिनही म्हटलं जाते. भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्रच अग्रभागी आहे, याचाही आनंद आहे. यापुढेही सर्वच आघाड्यांवर भारताची प्रगती व्हावी यासाठी एकजूट करावी लागेल. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांचे घटक असणारे कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा यांच्याबरोबर देशातील समृद्ध साधनसामुग्रीचे, निसर्गसंपदेचेही जतन आणि संवर्धन करण्यासाठी सजग-संवेदनशील राहावे लागेल. सार्वजनिक शिस्त, सामाजिक सलोखा, आर्थिक-सामाजिक दायित्त्व याचे भान बाळगावे लागेल. तरच येणाऱ्या पिढ्यांतही बांधिलकी निर्माण होईल. अशा पिढीकडे हे प्रजासत्ताकाचे संचित सुपूर्द करणे हीच आपली जबाबदारी आहे, हेच आपले राष्ट्र कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्व कटीबद्ध राहूया.

भारतीय प्रजासत्ताक चिरायू व्हावे यासाठी समता-बंधुता आणि एकात्मता या भावना वाढीस लावूया. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो! या मनोकामनेसह पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *