मुंबई शहर जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी किटचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वाटप अनुसूचित जमातीच्या बांधवांच्या समस्या सोडविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
Summary
मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्हा परिसरातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना आज मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते खावटी अनुदानाअंतर्गत अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना रेशन कार्ड, आधार कार्ड मिळविण्यासाठी तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात […]
मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्हा परिसरातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना आज मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते खावटी अनुदानाअंतर्गत अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना रेशन कार्ड, आधार कार्ड मिळविण्यासाठी तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे श्री. शेख यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय, मुंबई यांच्या वतीने आज अनुसूचित जमातीतील लाभार्थी कुटुंबांना खावटी अनुदान योजनेतील अन्नधान्य किटचे वाटप मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी समारंभात वितरित करण्यात आले. यावेळी आमदार अमीन पटेल, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बोरकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्यासाठी राज्य शासनाने खावटी अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानुसार, मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील 1924 कुटुंबे खावटी अनुदान योजनेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये उपनगरमधील 1818 आणि मुंबई शहरातील 106 कुटुंबांचा समावेश आहे. आज झालेल्या कार्यक्रमात मुंबई शहरातील 106 कुटुंबांपैकी 12 कुटुंबांना श्री. शेख व श्री. पटेल यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील 1760 कुटुंबांना खावटी अनुदानाचे प्रत्येकी 2 हजार रुपये थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
यावेळी श्री. शेख म्हणाले की, खावटी अनुदान योजनेत आणखी काही कुटुंबे पात्र ठरतात का याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. जी कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील त्यांची पात्रता निश्चित करून योजनेचा लाभ द्यावा. मुंबई शहर व जिल्ह्यामध्ये असलेल्या अनुसूचित जमातीतील कुटुंबांना ओळखपत्र देणे, रेशन कार्ड वितरित करणे यासह इतर समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.
श्रीमती चव्हाण यांनी योजनेची माहिती देऊन लाभार्थी निवडीची प्रक्रिया सांगितली.