मुंबईत वर्चस्व मराठीचेच… बुधवार, १२ मार्च २०२५ इंडिया कॉलिंग डॉ. सुकृत खांडेकर
Summary
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी (सुरेश) जोशी यांनी मुंबईत येऊन घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत येणाऱ्यांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे नाही, असे वक्तव्य केले. भैयाजींच्या वक्तव्यावर सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष अस्वस्थ झाले पण त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. युतीचा […]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी (सुरेश) जोशी यांनी मुंबईत येऊन घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईत येणाऱ्यांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे नाही, असे वक्तव्य केले. भैयाजींच्या वक्तव्यावर सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष अस्वस्थ झाले पण त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. युतीचा धर्म म्हणून ते शांत बसले असावेत, स्वत: मुख्यमंत्र्यांना मात्र महाराष्ट्र व मुंबईची भाषा मराठीच आहे अशी भूमिका मांडावी लागली. नंतर भैयाजी जोशींनीही खुलासा केला. पण त्यांनी आपण अनवधानाने बोललो असे म्हटले नाही. भैयाजींच्या वक्तव्यानंतर मुंबईत मात्र नवा वादंग
निर्माण झाला.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत चालू आहे, नेमके त्याच काळात भैयाजींनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकण्याची गरज नाही, असे सांगणे म्हणजे सरकारला अडचणीत आणण्यासारखे होते. स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मुंबईची, महाराष्ट्राची व राज्य सरकारची भाषा मराठीच आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे, मराठी बोलले पाहिजे, याविषयी भैयाजी जोशींचे दुमत असेल असे वाटत नाही. फडणवीस यांनी मराठीचा मुद्दा विरोधी पक्षांनी पेटविण्यापूर्वीच त्यावर आपली भूमिका मांडून वातावरण शांत राहील, असा प्रयत्न केला हा त्यांचा मुत्सद्दीपणा आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई व महाराष्ट्रातील अनेक उद्योग, मोठ्या संस्था, केंद्रीय कार्यालये मुंबई बाहेर गेले. मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र होणार होते, तेही गुजरातला हलवले. त्यावर विरोधी पक्षांनी आवाज उठवला. पण अशा निर्णयांनी मुंबईतील मराठी भाषिकांना काहीच वाटत नाही असे समजायचे का? मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकायची गरज नाही, घाटकोपरची भाषा गुजराती आहे, असे भैयाजी बोलले, त्यामुळे मुंबईतील मराठी भाषिक सुखावला आहे, असे मानायचे का? दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबईत एक कोटींहून अधिक अमराठी आहेत हे वास्तव आहे. पण या अमराठी लोकांना आपले म्हणून मुंबईतील मराठी भाषकांनी सामावून घेतले आहे याकडे कसे दुर्लक्ष करता येईल.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळायला पाहिजे यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने जे अभूतपूर्व आंदोलन केले. दि. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, संतपूर, डांग, उंबर गावांसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईत मोठे लढे दिले. सेनापती बापट, एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, टी. आर. नरवणे, केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे, ना. ग. गोरे, दादासाहेब गायकवाड, नाना पाटील, उद्धवराव पाटील, भाऊसाहेब राऊत,
ग. त्र्यं. माडखोलकर, अमर शेख, मधू दंडवते, जयंतराव टिळक अशी अनेक दिग्गजांची नावे सांगता येतील की, त्यांनी रस्त्यावर आणि विधिमंडळात लढे देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला आहे. याच मुद्द्यावर पंडित नेहरूंशी मतभेद झाल्याने चिंतामणराव देशमुखांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आचार्य अत्रेंनी मराठामधून पंडित नेहरू, मोरारजी देसाई व यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रविरोधी भूमिकेवर टीकेची झोड उठवली होती. १०६ जणांच्या बलिदानातून आणि शेकडो मराठी भाषिकांनी सांडलेल्या रक्तातून मुंबई महाराष्ट्राला राजधानी म्हणून मिळाली आहे.
जोपर्यंत आकाशात सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, असे मराठी माणसाला डिवचणारे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष
स. का. पाटील यांनी केले होते. येत्या पाच हजार वर्षांत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, असे भाकीत याच गुजराती भाषिक पाटलांनी वर्तवले होते. अत्रेंनी तर मराठातून मोरारजी देसाईंना कसाई, नेहरूंना औरंगजेब, तर यशवंतराव चव्हाणांना सूर्याजी पिसाळ अशी पदवी बहाल केली होती. मुंबई हे द्वैभाषिक राज्य करण्याचा निर्णय संयुक्त महाराष्ट्र आंदोनाने उधळून लावला आणि दि. १ मे १९६० रोजी रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. ज्यांना संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास ठाऊक आहे, ते कोणीही मुंबईत मराठी भाषा आली नाही तरी चालेल असे म्हणण्याचे धाडस करणार नाहीत.
अनेकदा गुजराती लोक मराठी लोकांना कमी लेखतात, अशा घटना अधून मधून घडत असतात. गुजराती वस्ती असलेल्या सोसायटीत मराठी लोकांना घरे मिळत नाहीत. मराठी लोकं मांसाहारी आहेत असे कारण सांगून त्यांना घरे नाकारली जातात. मुंबईत भूमिपुत्रांनाच घरे नाकारली जातात, यावरून अनेकदा रस्त्यावर असंतोष प्रकट होतो. आज मुंबईत मराठी माणूस जागरूक व संघटित आहे. मुंबई तुमची – भांडी घासा आमची, असे मग्रुरीचे बोलणे आता मुंबईत ऐकायला मिळत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून मराठीचा आणि मराठी माणसाचा दबदबा वाढला हे वास्तव आहे. मराठी माणसाला मुंबईत ताठमानेने उभे केले, ते शिवसेनाप्रमुखांनीच. आजही मुंबईचे आकर्षण सर्व देशाला आहे. मुंबई हे २४ तास धावणारे महानगर आहे. अहोरात्र या महानगरात खायला-प्यायला मिळते आणि बस, टॅक्सी, रिक्षा असे वाहनही मिळते. रात्रीचे ४ तास वगळता मुंबईची जनवाहिनी ओळखली जाणारी उपनगरी वाहतूक हे तर मुंबईचे वेगळेपण आहे. शिवाय ट्रान्स हार्बर, मेट्रो, मोनो रेल आहेतच. चेन्नईपेक्षा जास्त तमिळ, बंगळूरुपेक्षा जास्त कन्नड, लखनऊ-पाटणापेक्षा जास्त हिंदी, तिरुअनंतपुरमपेक्षा जास्त मल्याळी, हैदराबादपेक्षा जास्त तेलुगू भाषिक मुंबई महागरात आहेत. मुंबई हे बहुभाषिक किंवा कॉस्मॉपोलिटीन असले तरी मुंबईवर वर्चस्व मराठी भाषिकांचेच आहे. पोलीस स्टेशन्स, तहसील, रेशनिंग, टपाल कार्यालये, म्हाडा, सिडको, मंत्रालय किंवा राज्याची, सरकारची व निमसरकारी कार्यालये सर्वत्र मराठीचाच वावर आहे. पंचतारांकित हॉटेल्स, मॉल्स, उद्योग समूहांची कार्यालये, अगदी आयकर कार्यालये किंवा बँका सर्वत्र मराठी भाषिक अधिकारी व कर्मचारी दिसतात. विमानतळावरही मराठी लोक मोठ्या संख्येने आहेत. मग मुंबईत मराठी भाषा आली नाही तरी चालू शकते, हा शोध कोणी लावला? मुंबई शेअर बाजार असो किंवा हिंदुजा, लीलावती, बॉम्बे, जसलोक, ब्रीज कॅण्डी, अंबानी, नानावटी अशी मोठी आणि पंचतारांकित इस्पितळे असोत, सर्वत्र मराठी टक्का आहे. चित्रपट-रंगभूमी क्षेत्रातही मराठी झेंडा डौलाने फडकतो आहे. उघडा डोळे-बघा नीट, मुंबईवर मराठीचेच वर्चस्व आहे व
यापुढेही राहील.
मुंबई हे कॉर्पोरेट, बिझनेस, फायनान्शियल शहर आहे. म्हणूनच मराठी, हिंदी, इंग्रजी अशी तीनही भाषांमध्ये येथे व्यवहार होतो. घाटकोपर, मुलुंड, कांदिवली, बोरिवली अशा भागांत गुजराती लोक मोठ्या संख्यने आहेत. मुंबईत उत्तर भारतीय लोकांची संख्या गुजराती लोकांपेक्षा जास्त आहे. म्हणून कोणी मुंबईची भाषा हिंदी आहे असे म्हणत नाही. मुंबईने कोणत्याही भाषेला विरोध केलेला नाही, पण आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी परंपरा कधी सोडली नाही. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दहीहंडी, होळी-धुळवड, दसरा-दिवाळी हे सण मराठी भाषिक मुंबईत दणक्यात साजरे करतात व त्यातूनच मराठी भाषिक शक्तिशाली आहेत याचे दर्शन सर्व देशाला घडत असते. मराठी भाषा व मराठी अस्मिता ही मुंबई-महाराष्ट्राची ओळख आहे. बटाटा वडा, वडा-पाव, पुरणपोळी, कांदा भजी, भरली वांगी, लाडू-करंजी, चकली-कडबोळी-अनारसे, साबुदाण्याची खिचडी, मिसळ पाव, पिठलं-भाकरी, श्रीखंड-पुरी, बासुंदी, साखरभात, जिलेबी, खीर अशा मराठी पदार्थांनी सर्व देशाला वेड लावले आहे. रोजगाराच्या शोधात वर्षानुवर्षे परप्रांतीयांचे विशेषत: हिंदी भाषक राज्यातून मुंबईवर लोंढे आदळतच आहेत. मुंबईत झोपडपट्टी रहिवाशांना मोफत घरे मिळतात, महापालिकच्या शाळांत शिक्षण, गणवेष, वह्या-पुस्तके, दप्तर, रेनकोट, चपला-बूटही मोफत मिळतात. सरकारी व महापालिका इस्पितळात उपचार मोफत मिळतात. मुंबई कोणाला उपाशी ठेवत नाही ही या महानगराची खासियत आहे. रिक्षा, टॅक्सी, फेरीवाले, भाजीवाले, मजूर, अशा अनेक क्षेत्रांत अमराठी लाखोंच्या संख्येने आहेत. त्यांनी कामचलावू मराठी शिकावे, मराठी बोलावे असा सल्ला त्यांना कोणी देत नाही, उलट मुंबईत येणाऱ्यांना मराठी भाषा शिकण्याची गरज नाही असे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उत्तम मराठी बोलतात. पीयूष गोयल, मंगल प्रभात लोढा, मनोज कोटक, मिहीर कोटेजा, प्रकाश मेहता, मिलिंद देवरा, चंद्रिका केनिया, सुरेशदादा जैन, अरुण गुजराथी, अतुल शहा, योगेश सागर, गोपाळ शेट्टी, संजय निरुपम, कृपाशंकर सिंह, जयवंतीबेन मेहता, सुमन शहा, हेमराज शहा अशी अनेक अमराठी मोठी नावे सांगता येतील की ते अस्सल मराठी बोलतात. राजकारणी, डॉक्टर्स, चार्टर्ड अकाऊंटंट, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक मराठी बोलतात मग मुंबईत येणाऱ्यांना मराठी शिकण्याची गरज नाही, असे सांगणे कुणाच्या भल्यासाठी आहे?
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in