मुंबईकर जनतेला पाणी वाटप सुरळीतपणे होण्यासाठी सर्व रिक्त पदे भरा- कामगार सेनेची मागणी
जल अभियंता खात्यातील ‘जलद्वार नियंत्रक’( सुलुसमन ) संवर्गाची सुमारे ८० तसेच कामगार संवर्गाची सर्व रिक्तपदे तात्काळ भरावीत यासाठी ‘म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने’चे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ.संजय कांबळे- बापेरकर यांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प ) श्री.अभिजित बांगर यांना निवेदन दिले आहे.
पालिकेच्या जल अभियंता खात्याच्या मुंबई शहरातील ९ विभाग कार्यालयातील पाणी खात्याचे तसेच ६ जलाशय टेकडी येथील कर्मचारी मुंबई शहरास पाणी वाटप करतात.
यामध्ये कामगार व सुलुसमन पाणी सोडण्याचे काम करतात तर चावीवाला संवर्गाचे कर्मचारी नियोजनाचे काम करतात. त्यामुळे मुंबई शहरातील जनतेला योग्यप्रकारे पाणी पुरवठा व्हावा याकरिता कामगार,सुलुसमन व चाविवाला या संवर्गातील कर्मचाऱ्यांची सर्व शेड्युल्ड पदे भरणे अत्यंत आवश्यक आहे.
सुलुसमन संवर्गाची सुमारे ८० पदे रिक्त असल्याने, सुलुसमन ते ‘चाविवाला’ अशी पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना सुलुसमन पदाचेच काम करावे लागत आहे. परिणामी पदोन्नती होऊनही खालच्या पदावर काम करावे लागत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.
पाणी खात्यातील सर्व रिक्त पदे भरावीत यासाठी उपायुक्त (अभियांत्रिकी) यांच्यासोबतही संघटनेने बैठक घेतली होती. तथापि, जलद गतीने कार्यवाही न झाल्याने सुलुसमन संवर्गाची सुमारे ८० पदे तसेच कामगारांमधुन पदोन्नतीने सुलुसमन पदे भरण्यात येणार असल्याने, रिक्त होणारी व रिक्त असलेली कामगार संवर्गाची सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी करण्यात आली आहे.

