*मा.पंतप्रधानांनी कोविडमुळे महाराष्ट्रात किमान दोन महिने आरोग्य आणि आर्थिक आणीबाणीची घोषणा करावी..!* – डॉ. आशिष देशमुख *महाविकास आघाडी सरकार ला घरचा अहेर!* *मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचेकडे पत्राद्वारे केली मागणी. *मा. पंतप्रधानांनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३६० चा वापर करावा.
Summary
काटोल-प्रतिनिधी-/दुर्गाप्रसाद पांडे -२१एप्रील २०२१ “कोविड-१९ या साथीच्या आजाराला एक वर्ष झाले आहे. महाराष्ट्र राज्य याचा सर्वात जास्त मार सहन करीत आहे. उर्वरित देशांच्या तुलनेत आपल्या देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे आणि महाराष्ट्रात तर कहरच करीत आहे. महाराष्ट्रातील एकूण […]
काटोल-प्रतिनिधी-/दुर्गाप्रसाद पांडे -२१एप्रील २०२१
“कोविड-१९ या साथीच्या आजाराला एक वर्ष झाले आहे. महाराष्ट्र राज्य याचा सर्वात जास्त मार सहन करीत आहे. उर्वरित देशांच्या तुलनेत आपल्या देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे आणि महाराष्ट्रात तर कहरच करीत आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या ३.८४ दशलक्ष असून मृत्यूंचा आकडा ६०,४७३ आहे. दुसरी लाट राज्य सरकारच्या आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेसह महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीस अधिक घातक ठरत आहे. राज्य सरकार परिस्थिती कुशलतेने हाताळण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरत आहेत कारण महाराष्ट्र राज्यात दररोज ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली असून रूग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आणि जीवनरक्षक औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे आणि त्यामुळे मृत्यूची संख्या झपाट्याने वाढली आहे. अत्यंत हृदयस्पर्शी अशी परिस्थिती म्हणजे मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी घाटावर प्रतीक्षा करावी लागत असून अंत्यसंस्कारासाठी लाकडांचीसुद्धा कमतरता आहे.
परिस्थिती इतकी गंभीर आहे की, माननीय उच्च न्यायालयाला प्रत्येक प्रशासकीय निर्णयामध्ये हस्तक्षेप करावा लागत आहे आणि बेडची संख्या वाढविण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस दलाला तैनात करण्याचे निर्देश द्यावे लागत आहे. ठाणे येथे प्रशासनाद्वारे प्रत्येक रूग्णाला दोन रेमडीसिवीर इंजेक्शन देण्यात येत आहेत, तर नागपूर शहरात दर दोन रूग्णांकरिता एक रेमडीसिवीर वायल देण्यात येत आहे. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून नागपूर शहराला तातडीने १०,००० रेमडीसिवीर इंजेक्शन देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. योग्य पावले उचलण्यात प्रशासन कसे अपयशी ठरले, हे यावरून दिसून येते.
महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमजोर आहे. याचा परिणाम म्हणजे आरोग्य यंत्रणेचे अपयश आणि त्यामुळे होणारे हजारो लोकांचे मृत्यू. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविणे हे राज्य सरकारचे मूलभूत कर्तव्य आहे. म्हणूनच परिस्थिती आणखी खराब होऊ नये म्हणून केंद्राने हस्तक्षेप करण्याची हीच योग्य वेळ आहे.
कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या सध्याच्या भयावह परिस्थितीमुळे मी अत्यंत दु:खी आहे. भारत सरकारने योग्य पाऊल उचलण्याची हीच खरी वेळ आहे. मी विनंती करू इच्छितो की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३६० नुसार, कोविड-१९ या आजारामुळे महाराष्ट्रात किमान दोन महिने आर्थिक आणीबाणी आणि आर्थिक परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आरोग्य आणीबाणीची घोषणा करावी, जेणे करून राज्यास सामान्य स्थिती प्राप्त होईल.
म्हणूनच मी आपणांस नम्रपणे विनंती करतो की, आपण भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३६० अन्वये महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य तसेच आर्थिक आणिबाणीची घोषणा करावी, जेणेकरून कोविड-१९ विरूद्ध आमचा लढा अधिक चांगला होईल. मला विश्वास आहे की, तसे झाल्यास महाराष्ट्रात कोविड व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या चांगल्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होतील आणि लोकांचे बहुमूल्य जीवन वाचविण्यात मदत मिळेल.
महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल मी अनेक तज्ञांशी चर्चा केली आहे आणि हाच सल्ला सर्वांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून केंद्र सरकार माझी ही विनंती मान्य करेल, असा मला विश्वास आहे”, असे एक पत्र माजी आमदार व कॉंग्रेसचे नेते डॉ. आशिष देशमुख यांनी भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना २० एप्रिल २०२१ ला पाठविले आहे. महाराष्ट्रात कोरोनाने तांडव माजविले असून दररोज मृत्यूंचा आकडा वाढत आहे. आज महाराष्ट्राला आरोग्य आणि आर्थिक आणीबाणीची गरज आहे, असे त्यांचे मत आहे.
संलग्न- मा. पंतप्रधानांना वरील उल्लेखित पत्र.