मालसाणे णमोकार तीर्थ विकासासाठी ३६.३५ कोटींच्या आराखड्यास मान्यता भाविकांना अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी आल्याचे समाधान मिळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Summary
मुंबई | प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या मालसाणे येथील जैन धर्मियांच्या पवित्र णमोकार तीर्थाच्या सर्वांगीण विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली. या विकास आराखड्यांतर्गत […]
मुंबई | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या मालसाणे येथील जैन धर्मियांच्या पवित्र णमोकार तीर्थाच्या सर्वांगीण विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली.
या विकास आराखड्यांतर्गत होणारी सर्व कामे दर्जेदार असावीत, त्यामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये तसेच विहित कालावधीत कामे पूर्ण करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मिक अनुभूतीसोबतच तीर्थस्थळी येण्याचे समाधान मिळावे, अशा पद्धतीने विकासकामे राबवावीत, असेही त्यांनी सांगितले.
मालसाणे णमोकार तीर्थ येथे ६ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विकास आराखड्यात स्थायी स्वरूपाच्या २४ कोटी २६ लाख रुपयांची कामे तसेच महोत्सव आयोजनासाठी १२ कोटी ९ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे येणार असल्याने त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, वाहतूक व आरोग्य सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात. भविष्यातही भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या तीर्थाच्या विकासातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होणार असून, मालसाणे णमोकार तीर्थ हे जैन धर्मियांचे राज्यातीलच नव्हे तर देशातील एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून सुमारे १० ते १५ लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, हा सोहळा यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सादरीकरण केले. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार राहुल आहेर, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, सचिव (नियोजन) शैला ए., नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच णमोकार तीर्थचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोडक्यात णमोकार तीर्थ विकास आराखडा
नाशिक–धुळे महामार्गावर मौजे मालसाणे गावाजवळ सुमारे ४० एकर भूभागावर वसलेले णमोकार तीर्थ हे जैन धर्मियांचे पवित्र स्थान आहे. विकास आराखड्यानुसार काँक्रीट रस्ते, संरक्षक भिंत, नौकायन सुविधा, हेलिपॅड, पार्किंग व्यवस्था, वीजपुरवठा व स्वच्छतेसंबंधी कामे करण्यात येणार आहेत.
तसेच पंचकल्याण महोत्सवासाठी पाण्याच्या टाक्या, ४५० युनिटचे शौचालय ब्लॉक, विद्युतीकरण, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष व तात्पुरत्या वैद्यकीय युनिटची उभारणी करण्यात येणार आहे.
संकलन:- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
