मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा; मुंबईत आशियातील सर्वात मोठे GCC उभारणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १२ डिसेंबर २०२५ :
महाराष्ट्राला Global Capability Center (GCC) हब बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल टाकले असून, ब्रुकफिल्ड कंपनी मुंबईत सुमारे २० लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातील सर्वात मोठे GCC उभारणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून १५ हजार थेट आणि ३० हजार अप्रत्यक्ष असे एकूण ४५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
—
मायक्रोसॉफ्ट–महाराष्ट्र एआय सहकार्याला नवी दिशा
जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, ANSR चे सीईओ विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासह राज्यातील गुंतवणूक आणि तांत्रिक भागीदारीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,
“राज्यातील कुशल मनुष्यबळ, भक्कम पायाभूत सुविधा आणि उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र जागतिक कंपन्यांसाठी पसंतीचे ठिकाण ठरत आहे. नव्या GCC धोरणामुळे कौशल्याधारित रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धीला मोठी चालना मिळेल.”
—
मायक्रोसॉफ्टकडून महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचे संकेत
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टने आगामी गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, अशी विनंती केल्याचे सांगितले. यावर मायक्रोसॉफ्टने भारतातील १७ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) राष्ट्रीय केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
—
AI आधारित गुन्हे नियंत्रण मॉडेल देशासाठी दिशादर्शक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Microsoft AI Tour कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे सादरीकरण केले.
मुख्यमंत्री म्हणाले की,
“कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने गुन्हे नियंत्रणासाठी महाराष्ट्राने विकसित केलेले मॉडेल देशभरासाठी दिशादर्शक ठरत आहे.”
—
Marble प्लॅटफॉर्ममुळे गुन्हे उघडकीस २४ तासांत यश
महाराष्ट्र सरकारने विकसित केलेल्या Marble AI प्लॅटफॉर्ममुळे सायबर व आर्थिक गुन्हे ३–४ महिन्यांऐवजी केवळ २४ तासांत शोधता येत आहेत, यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान टळत असून गुन्हेगारांवर जलद कारवाई शक्य झाली आहे.
—
आरोग्य, शिक्षण, कृषी क्षेत्रात AI Co-Pilots विकसित होणार
या बैठकीत आरोग्य, शिक्षण, कृषी आणि शासकीय सेवा वितरणासाठी AI Co-Pilots विकसित करण्यावरही चर्चा झाली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासन सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि प्रभावी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
—
उद्योग व लॉजिस्टिक्स क्षेत्रातूनही गुंतवणुकीचे संकेत
जागतिक लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी FedEx देखील मुंबई–नवी मुंबई विमानतळ परिसरात GCC आणि इतर ऑपरेशन्ससाठी गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
—
या बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. अनबलगन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
—
संकलन :- श्री राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक तथा डायरेक्टर
