माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित आराखडा मान्यतेबाबत त्वरित कार्यवाही करा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
Summary
मुंबई, दि. 30 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे उभारण्याबाबत सुधारित आराखडा समाजकल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेसाठी सादर करावा व स्मारक उभारणीबाबत कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील गोरेगाव विभाग (ता. […]
मुंबई, दि. 30 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे उभारण्याबाबत सुधारित आराखडा समाजकल्याण आयुक्तालयाच्या मान्यतेसाठी सादर करावा व स्मारक उभारणीबाबत कार्यवाही त्वरित करण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव विभाग (ता. माणगाव) येथील पंचशील बौद्धजन सेवा संघ, स्वयंसेवी संस्थेमार्फत स्मारक उभारणे व विविध लोकोपयोगी उपक्रमाबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीदरम्यान श्री.मुंडे बोलत होते. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु. आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.
श्रीवर्धन राज्यमार्गाला लागून असलेल्या मौजे गोरेगाव येथे पंचशील बौद्धजन सेवासंघाच्या जागेवर 1985 मध्ये संस्थेची इमारत उभारण्यात आली होती. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सभा घेतली होती. अशा या ऐतिहासिक स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारुन बहुद्देशीय इमारत बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम संस्थेमार्फत पूर्ण झाले असून उर्वरित इमारत बांधकामाकरिता अनुदान मिळण्याबाबत संस्थेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.
यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, या बहुद्देशीय स्मारक व इमारतीसाठी नव्या आराखड्यानुसार निधी देण्यात येणार आहे. या बहुद्देशीय प्रकल्पातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य घडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, सहसचिव दि. रा. डिंगळे, अवर सचिव अ.कों. अहिरे, पंचशील बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष विकास गायकवाड, संघाचे सचिव संदिप साळवी, श्री. बापू सोनगिरे व संबधित अधिकारी उपस्थित होते.