माजी माहिती उपसंचालक डॉ.संभाजी खराट यांना मंत्रालयात श्रद्धांजली
मुंबई,दि.12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांचे नुकतेच निधन झाले. ते 31 जानेवारी 2023 ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथून निवृत्त झाले होते. आज मंत्रालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी श्रद्धांजली वाहिली.
श्रद्धांजली वाहताना संचालक (माहिती) दयानंद कांबळे म्हणाले की, डॉ.खराट यांच्या शासकीय नोकरीची सुरुवात कोल्हापूर येथून झाली होती. रत्नागिरी व ठाणे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर 10 ऑक्टोबर 2021 ला उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे तेरुजू झाले होते. डॉ. खराट वाचनप्रेमी, सतत अभ्यासू वृत्ती असलेले आणि उत्कृष्ट संपादन कौशल्य असलेले लेखक म्हणूनही परिचित होते. महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अभ्यासक होते. ते उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी त्यांना शासनाचे दोन पुरस्कार, उत्कृष्ट पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा पुरस्कार, डॉ. आंबेडकर पुरस्कार, शब्दशिल्प पुरस्कार तसेच चौथा स्तंभ पुरस्कारासह अन्यही पुरस्कार मिळाले होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन व माहितीपटांची निर्मिती केली होती.त्यांनी विविध 25 विषयांच्या पुस्तकांचे लिखाण केले असून, त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व गमावले असल्याचेही संचालक श्री.कांबळे यावेळी म्हणाले.
माहिती व जनसंपर्क विभागातील माजी वरिष्ठ सहायक संचालक प्रकाश डोईफोडे, पुणे जिल्हा माहिती कार्यालय येथील माजी प्रदर्शन सहाय्यक अजित कोकीळ, लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचे वाहनचालक प्रविण बिदरकर यांचेही नुकतेच निधन झाल्याने यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
संचालक किशोर गांगुर्डे, उपसंचालक गोविंद अहंकारी, उपसंचालक सीमा रनाळकर, उपसंचालक (लेखा) सुभाष नागप यांच्यासह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.