महिला लोकशाही दिनाचे १९ जानेवारी रोजी आयोजन
मुंबई, दि. १४ : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार महिला लोकशाही दिन सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे आयोजित करण्यात येणार आहे, असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
या उपक्रमांतर्गत पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी व अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा पातळीवर सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, २१५ बी.बी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई – ४०००२५ येथे तक्रार अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.
तक्रार दाखल करताना अर्ज निर्धारित नमुन्यात भरावा. तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे, अपूर्ण अर्ज, धर्म व राजकारण विषयक बाबी अथवा वैयक्तिक स्वरूप नसलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
000
