महिलांना आर्थिक साक्षर करणे महत्वाचे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी’ कार्यक्रम

मुंबई, दि. 12 : गरजू महिलांना उद्योगपूरक साधने पुरविण्याच्या सहाय्यासोबतच उद्योग कायम टिकविणे आणि वाढविणे यासाठी आर्थिक साक्षरही करावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. बॉबकार्ड आणि युनायटेड वे मुंबई यांनी गरजू महिलांना उद्योगपूरक वस्तुंच्या वितरणाबाबत महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी अभिनंदन केले.
जीवनाची पुनर्कल्पना करणे : शक्ती समृद्धी या कार्यक्रमाअंतर्गत १५७ महिलांना चर्चगेट येथील वालचंद हिराचंद हॉल येथे उद्योगपूरक वस्तुंचे वितरण महिला व बालविकास मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक अनु अग्रवाल, बॉबकार्डचे (बँक ऑफ बडोदाची उपकंपनी) व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र राय, मानव संसाधन प्रमुख रवी खन्ना, सीएसआरचे विभागीय अधिकारी विपुल बरोट, युनायटेड वे मुंबईचे उपाध्यक्ष अनिल परमार, मुख्य कार्यकारी अधिकारी सना शेख, व्यवस्थापकीय सहायक चिन्मय पाटील यांच्यासह अधिकारी आणि महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, व्यावसायिक शिक्षण आणि उद्योग उभारणीस इच्छुक असलेल्या महिलांना आर्थिक परिस्थिती अभावी उद्योग सुरू करता येत नाही. अशा महिलांना बॉबकार्ड उद्योगपूरक वस्तू देऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास सहकार्य करीत आहे. यानंतर त्यांना प्रशिक्षण देणेही महत्त्वाचे आहे, त्यांना भविष्यात उद्योगवाढीसाठी आर्थिक साक्षर करणे, गुंतवणुकीचे आणि बचतीच्या पर्यायांची माहिती देणे महत्वाचे असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
या अंतर्गत या १५७ महिलांना पुढील सहा महिने व्यवसाय कौशल्य, उद्योजकता याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
०००