महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाराष्ट्रात गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणणार -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Summary

मुंबई, दि. 22 : महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर यासंदर्भात अभ्यासाअंती आवश्यक प्रस्ताव सादर करून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी […]

मुंबई, दि. 22 : महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर यासंदर्भात अभ्यासाअंती आवश्यक प्रस्ताव सादर करून कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे प्रधान सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे पाटील, विधि व न्याय विभागाचे सहसचिव महेंद्र जाधव, गृह विभागाचे सहसचिव राहुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक सागर पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन व गृह विभागाच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्याचे तसेच अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी दिले.

अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ म्हणाले की, राज्यात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादन, वितरण व विक्रीवर बंदी आहे. अवैध व्यवहारावर अधिक कठोर कायदेशीर कारवाईसाठी गुटखा विक्रेत्यांवर मकोका लागू करण्याबाबत कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करून गुटखा व्यवसायाशी संबंधित गुन्ह्यांनाही ‘मकोका’च्या कक्षेत आणण्यासाठी कायदा अधिक कठोर केला जाणार आहे.

गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात राज्यभर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून विविध जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.

गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर मकोका लागू करण्यासाठी कायद्यात आवश्यक तरतुदी सुचविण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाने गृह विभाग व विधि व न्याय विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांनी दिले.

विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अशा प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्यास त्यावर तातडीने आणि कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याचेही अन्न व औषध प्रशासन मंत्री झरवाळ यांनी सांगितले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *