BREAKING NEWS:
कृषि नई दिल्ली हेडलाइन

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

Summary

नवी दिल्ली, 27 :भारत मंडपम, नवी दिल्ली येथे 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे प्रदर्शन भारताच्या कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात जगभरातील उत्पादक, खरेदीदार, […]

नवी दिल्ली, 27 :भारत मंडपम, नवी दिल्ली येथे 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे प्रदर्शन भारताच्या कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात जगभरातील उत्पादक, खरेदीदार, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला असून, महाराष्ट्राने या संधीचा प्रभावीपणे लाभ उठवला आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करत राज्यातील कृषी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.

मंत्री जयकुमार रावल यांनी उद्घाटनानंतर सांगितले की, वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभाग घेण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देणे, नव्या गुंतवणुकीला आकर्षित करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हा आहे. महाराष्ट्र हे द्राक्षे, संत्री, आंबा, केळी, डाळिंब, पेरू यांसारख्या फळांचे आणि हळद, मिरची, लसूण यांसारख्या मसाल्यांचे प्रमुख उत्पादक राज्य आहे. या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यासाठी पॅकिंग, प्रक्रिया, लॉजिस्टिक आणि ब्रँडिंग यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रदर्शनाचे व्यासपीठ या सुधारणांसाठी एक उत्तम संधी ठरेल, असेही मंत्री श्री. रावल यांनी अधोरेखित केले.

प्रदर्शनादरम्यान मंत्री श्री. रावल यांनी जर्मनी, रशिया, जपान आणि इस्रायल यांसारख्या देशांच्या दालनांना भेटी देऊन त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेतला. इस्रायलचे जलसिंचन तंत्रज्ञान, जपानचे पॅकिंग आणि साठवणूक तंत्रज्ञान तसेच रशियाच्या प्रक्रिया उद्योगातील नवोन्मेष यांचा महाराष्ट्रातील शेतकरी आणि उद्योगांना लाभ होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परदेशी कंपन्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून, लवकरच गुंतवणुकीसंबंधी काही महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात आधुनिक प्रक्रिया प्रकल्प, कोल्ड स्टोरेजेस, निर्यात केंद्रे आणि लॉजिस्टिक सुविधा उभारण्यास गती मिळेल.

महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या कृषी संपत्तीचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले. द्राक्षे, संत्री, आंबा, केळी, डाळिंब, हळद, मिरची आणि लसूण यांसारख्या उत्पादनांनी परदेशी खरेदीदारांचे लक्ष वेधले. या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असली तरी योग्य ब्रँडिंग, पॅकिंग आणि वितरण व्यवस्थेच्या अभावामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या परिश्रमाचे पूर्ण मूल्य मिळत नाही. या व्यासपीठामुळे या उणिवा दूर होऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळतील, असे मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

भविष्यातील योजनांबाबत बोलताना मंत्री श्री. रावल यांनी सांगितले की, या प्रदर्शनातील अनुभवाचा उपयोग करून महाराष्ट्र कृषी व पणन मंडळ आणि राज्य शासन शेतकरी व अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी नवे धोरण आखेल. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी, त्यांची उत्पादने जागतिक स्तरावर पोहोचावीत आणि त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी विशेष योजना राबविल्या जातील. शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोणत्या उत्पादनांना मागणी आहे हे जाणून त्यानुसार उत्पादन करणे महत्त्वाचे आहे. जागतिक दर्जाच्या उत्पादनावर भर दिल्यास शेतकऱ्यांना निर्यातीचा थेट लाभ मिळेल आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल.”

प्रदर्शनात विविध विषयांवर चचासत्रे

वर्ल्ड फूड इंडिया 2025 च्या दुसऱ्या दिवशी शाश्वतता, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी यावर केंद्रित चर्चा झाल्या. भारताला जागतिक अन्नटोपली (ग्लोबल फूड बास्केट) म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने या चर्चा महत्त्वपूर्ण ठरल्या. उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, झारखंड आणि बिहार यांसारख्या राज्यांनी आपली सत्रे आयोजित केली, तर न्यूझीलंड, व्हिएतनाम, जपान आणि रशिया यांनीही आपली प्रगती सादर केली. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (MOFPI) पाळीव प्राण्यांचे अन्न, न्यूट्रास्युटिकल्स, विशेष अन्नघटक, अल्कोहोलिक पेये आणि वनस्पती-आधारित अन्न यांसारख्या विषयांवर 13 सत्रांचे आयोजन केले.

या शिखर परिषदेत 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीसह 21 कंपन्यांनी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या, ज्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी झालेल्या करारांचे एकूण मूल्य 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. रशिया आणि पोर्तुगाल यांच्यासोबत शासकीय स्तरावरील बैठका झाल्या, ज्यामुळे शेती आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सहकार्याला चालना मिळेल. याशिवाय, FSSAI च्या तिसऱ्या ग्लोबल फूड रेग्युलेटर्स शिखर परिषदेने अन्न सुरक्षा मानकांवर चर्चा केली, तर सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने 24 व्या इंडिया इंटरनॅशनल सीफूड शोद्वारे भारताच्या सीफूड निर्यातीच्या क्षमतेवर प्रकाश टाकला.

वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे महाराष्ट्र आणि भारतासाठी जागतिक संधींचे प्रवेशद्वार ठरले आहे. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, उद्योगांना गुंतवणुकीचे नवे प्रवाह आणि कृषी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने हा मेळावा ऐतिहासिक ठरेल. भारताला अन्न प्रक्रिया क्षेत्रात ग्रहणक्षम आणि गुंतवणुकीसाठी सज्ज ठिकाण म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण, ज्ञान सामायिकरण आणि अन्न सुरक्षेपासून पोषण सुरक्षेपर्यंतचा प्रवास मजबूत करण्याचे आवाहन या कार्यक्रमातून जागतिक भागधारकांना करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *