महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
Summary
ठाणे, दि. 18 (जिमाका) – वडपे-ठाणे महामार्गावरील कामांची आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी पाहणी केली. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, रहदारी सुरळीत राहिल, यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात. तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, […]
ठाणे, दि. 18 (जिमाका) – वडपे-ठाणे महामार्गावरील कामांची आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी पाहणी केली. पावसाळ्याच्या काळात या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, रहदारी सुरळीत राहिल, यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात. तसेच प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच जिल्हा व ठाणे शहर वाहतूक पोलीसांच्या मदतीसाठी तातडीने वॉर्डन नेमण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भुसे यांनी आज वडपे – ठाणे महामार्गाच्या डांबरी रस्त्याचे आठ पदरी काँक्रिटीकरण करण्याच्या कामांची पाहणी केली. तसेच यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीए), पोलीस, परिवहन, महामार्ग पोलीस आदी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड, रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, कार्यकारी अभियंता सुहास बोरसे, उपअभियंता आर.एम. डोंगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील, यांच्यासह रस्त्याचे कंत्राटदार व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. भुसे यांनी वडपे ते खारेगाव नाका या मार्गाची पाहणी केली. वडपे-ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस विभाग व एमएसआरडीए यांनी एकत्रितपणे नियोजन करावे. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे, अशा ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमून तातडीने वाहतूक कोंडी सोडविण्यात यावेत. यासाठी एमएसआरडीएने पोलीसांना ट्रॅफिक वॉर्डन पुरवावेत. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यामुळे कोंडी होत असल्यास तेथील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत. एखादे वाहन रस्त्यावर बंद पडल्यास तातडीने दूर करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी यावेळी केल्या.
रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या मार्गावर खड्डे बुजविण्यासाठी मोबाईल व्हॅनसह यंत्रणा कार्यरत केली आहे. तसेच बंद पडलेली वाहने तातडीने दूर करण्यासाठी क्रेनची सुविधा पुरविण्यात आली आहे, अशी माहिती श्री. गायकवाड यांनी यावेळी दिली.
०००