महामहिम राज्यपाल महोदयांनी गोंडवाना विद्यापीठातील समस्या मार्गी लावाव्यात सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांची मागणी
प्रा. संध्या येलेकर/गडचिरोली
12 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा. भगतसिंह कोशारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्याचे औचित्य साधून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी गोंडवाना विद्यापीठातील समस्या सोडविण्याची महामहीम राज्यपालांना विनंती केलेली आहे.
गडचिरोली व चंद्रपूर या दोन आदिवासीबहुल व वनाधारित जिल्ह्यातील शैक्षणिक विकास साधण्यासाठी नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून 27 सप्टेंबर 2011 रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.विद्यापीठ स्थापन होऊन दहा वर्षे पूर्ण होत आहे परंतु विद्यापीठातील समस्या सुटता सुटत नाही मागील वर्षी विद्यापीठाला 12 ब चा दर्जा सुद्धा प्राप्त झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षण अभियानांतर्गत अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु समस्या मात्र कायम आहे.
*विद्यापीठातील समस्या*
१) गोंडवाना विद्यापीठातील जमीन हस्तांतराचा प्रश्न गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहे. जमीन हस्तांतरासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध आहे परंतु हस्तांतरण होत नाही त्यामुळे विद्यापीठाचा विकास खोळंबला आहे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विद्यापीठाअंतर्गत अधिग्रहित असून त्या शेतकऱ्यांना त्याचा अजून पर्यंत मोबदला मिळाला नाही. तो त्वरित मिळण्यात यावा आणि जमीन हस्तांतराचा प्रश्न निकालात काढावा.
२) विद्यापीठात शिक्षकेतर अधिकाऱ्यांची तसेच वर्ग 3 व 4 ची अनेक पदे रिक्त आहेत ती नवीन आरक्षण धोरणानुसार भरण्यात यावी.
३) विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्र ग्रंथालयासाठी आकृतिबंध अनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे 2012 पासून मंजुरीसाठी प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर मंजूर करून नवीन आरक्षण धोरणानुसार भरण्यात यावी.
४)प्राध्यापक पदभरती मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने व केंद्र सरकारने सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये यांना लागू केलेला संवर्ग निहाय आरक्षण कायदा (Central Education Institution Reservation In Teacher Cadre Act 2019) महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांना लवकरात लवकर लागू करण्यात यावा.
वरील सर्व मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून माननीय राज्यपाल महोदयांनी त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती
प्रा. संध्या येलेकर
सिनेट सदस्य
गोंडवाना विद्यापीठ
गडचिरोली