महापुरुषांची स्मारके प्रेरणा देणारी ठरतील – पालकमंत्री जयकुमार रावल बोरकुंड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण; फुले स्मारकाचे भूमिपूजन
Summary
धुळे, दि. १८ (जिमाका): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची स्मारके भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. धुळे तालुक्यातील […]
धुळे, दि. १८ (जिमाका): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची स्मारके भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा भूमिपूजन समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महापौर मायादेवी परदेशी, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राघवेंद्र भदाणे, आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भदाणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रावल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य निर्माण केले. त्यांनी घडविलेला इतिहास, युद्धनीती अभ्यासाचा विषय आहे. तो तरुणांनी समजून घ्यावा. तसेच महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अलौकिक आहे. या महापुरुषांची स्मारके प्रेरणा देणारी ठरतील, असे सांगत त्यांनी बोरी परिसरात लवकरच उपबाजार कार्यान्वित करण्यात येईल. तसेच सुलवाडे- जामफळ – कनोली उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले.
मंत्री भुजबळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशात राज्यक्रांती घडविली, तर महात्मा फुले यांनी समाज क्रांती घडविली. आजचा कार्यक्रम म्हणजे सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्र विचारांचा संगम होय. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे, लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला.
मंत्री भुसे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक बोरकुंड गावाच्या वैभवात भर घालेल. शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणा देणारा आहे. त्याची माहिती शालेय अभ्यासक्रमांत देण्यात येईल. राज्यातील थोर पुरुषांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
आमदार भदाणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य चालविण्याचा आदर्श निर्माण केला.
माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे, माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, प्रा. शरद पाटील, आजी – माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००
