महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाने रायगड जिल्ह्याची अपरिमित हानी – पालकमंत्री कु.आदिती तटकरे
Summary
अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका):- महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आपल्या शोकसंदेशात पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणतात, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष, महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त धक्कादायक […]
अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका):- महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या शोकसंदेशात पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणतात, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे उपाध्यक्ष, रायगड जिल्हा अध्यक्ष, महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने रायगड जिल्ह्याची अपरिमित अशी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली तसेच संपूर्ण जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना.
आपल्या शोकसंदेशात पालकमंत्री कु.तटकरे पुढे म्हणतात, स्वर्गीय माजी आमदार माणिकराव जगताप रायगड जिल्ह्याच्या राजकारण व सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, कार्यकुशल, उत्तम वक्तृत्व असलेले आदरणीय व्यक्तिमत्व. ते काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्ह्याचे उपाध्यक्ष तसेच रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम जबाबदारी सांभाळलेले, उत्तम संघटक, लोकप्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या निमित्ताने माझा त्यांच्याशी वैयक्तिक राजकीय संबंध आला होता. त्यानंतर विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने आमची अनेकदा भेट झाली. अलीकडेच तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच्या पाहणी दौऱ्यात श्री.माणिकराव जगताप, मी स्वत:, आमदार अनिकेत तटकरे असे आम्ही एकत्रच होतो. महाड पोलादपूरकरांसाठी काहीतरी करण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या रूपाने सतत हसतमुख असणारे एक उमदे नेतृत्व हरपले.
महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या निधनाने जनमाणसाचे प्रेम लाभलेले, रायगड जिल्ह्याचे, कोकणचे कर्तृत्ववान सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेले आहेत. नुकतेच जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय माजी आमदार मधुकर ठाकूर यांचेही निधन झाले आणि आता माजी आमदार माणिकराव जगताप यांचेही निधन झाले. त्यांच्या जाण्याने रायगडकरांची कधीही भरुन न येणारी अपरिमित अशी हानी झाली आहे.
माजी आमदार माणिकराव जगताप यांना पुन:श्च भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही ईश्वर चरणी प्रार्थना, या शब्दांत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.