महसूल व रेल्वे विभागांनी समन्वयातून विकासकामांना गती द्यावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
Summary
नागपूर दि. 11 : रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडील रेल्वेशी संबंधीत विकास कामांना प्राथमिकता द्यावी. तसेच, रेल्वेची नागपूर महसूल विभागात करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांसाठी सहाही जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी रेल्वे विभागाला आश्वस्त केले. नागपूर विभागात […]
नागपूर दि. 11 : रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडील रेल्वेशी संबंधीत विकास कामांना प्राथमिकता द्यावी. तसेच, रेल्वेची नागपूर महसूल विभागात करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांसाठी सहाही जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी रेल्वे विभागाला आश्वस्त केले.
नागपूर विभागात सुरू असलेल्या रेल्वे व तत्सम इतर पायाभूत प्रकल्पांच्या कामातील अडचणींबाबत महसूल व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी श्रीमती बिदरी बोलत होत्या. भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी.व्ही. जगताप तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी दृरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत भंडारा जिल्ह्यात तुमसर रोड स्टेशन येथे रासायनिक खते व अन्नधान्यासाठी गोदाम व रॅक पाँईट सुविधा उपलब्ध करणे, चंद्रपूर जिल्ह्यात ताडळी व मुल येथील रॅक पाँईटवर विद्युत, पाणी व इतर आवश्यक पूरक सुविधा उपलब्ध करणे, गोंदिया येथील मालधक्क्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सदर मालधक्का स्थलांतरीत करणे, गडचिरोली-कोंडसरी-बल्लारशा व कोंडसरी ते मनचेरीया रेल्वे मार्गाबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करणे, नागपूर जिल्ह्यातील कामठी रेल्वे स्टेशन आणि इतवारी ते मोतीबाग ब्रॉडगेज कामातील रोडवाहतूक वळवणे व अतिक्रमण हटविणे, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व देवळी येथील रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या अमृत योजनेच्या पाईपलाईनच्या कामाबाबत सहकार्य करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली.
बैठकीला मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सर्वश्री विनोद भंगाले, पुष्कर श्रीवास्तव, अनिल बन्सोड, अरविंद विश्वकर्मा, अविनाशकुमार आनंद, अजय पटेल, उपायुक्त प्रदीप कुळकर्णी (सामान्य प्रशासन) व कमलकिशोर फुटाणे (विकास), नगरपालिका प्रशासन उपायुक्त मनोज शाह, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) माधुरी तिखे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
000