मलनिस्सारण, स्वच्छता व पाणीपुरवठा आराखड्यात वाढत्या गरजा लक्षात घेऊन बदल आवश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Summary
नागपूर महानगरातील विकास कामांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक नागपूर,दि.06: वाढत्या नागपूर महानगरातील पायाभूत सुविधांसमवेत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व कचरा व्यवस्थापन आदी बाबत भविष्याचा विचार करुन आवश्यक तेथे आराखड्यात बदल करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत विविध भागात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा विचार करुन जो मास्टरप्लॅन तयार केला आहे त्यात आवश्यक तो बदल […]
नागपूर महानगरातील विकास कामांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक
नागपूर,दि.06: वाढत्या नागपूर महानगरातील पायाभूत सुविधांसमवेत पाणीपुरवठा, मलनिस्सारण व कचरा व्यवस्थापन आदी बाबत भविष्याचा विचार करुन आवश्यक तेथे आराखड्यात बदल करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत विविध भागात नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा विचार करुन जो मास्टरप्लॅन तयार केला आहे त्यात आवश्यक तो बदल करुन कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नागपूर महानगरातील मलनिस्सारण, स्वच्छता, नवीन रस्ते, नवीन वस्त्यांना पाणीपुरवठा याबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ.नितीन राऊत, विधान परिषद सदस्य प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, आमदार विकास ठाकरे, नागपूर मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर आदी उपस्थित होते.
नागपूर महानगर पालिकेच्या हद्दीत अनेक नवीन भागाचा समावेश झाला आहे. नवनवीन अपार्टमेंट्स याची भर पडली आहे. त्यानुसार उपलब्ध असलेला पाणीपुरवठा, मलनिस्सारणच्या पाईपलाईन, वाढत्या बाजारपेठा याचा अप्रत्यक्ष ताण हा सद्यास्थितीत असलेल्या सुविधांवर पडणे स्वाभाविक आहे. तथापि भविष्यातील सर्व गरजांचा विचार करुन यापूर्वी जो आराखडा तयार करण्यात आला आहे त्यात आवश्यक तो बदल तात्काळ करुन नवीन विकासकामांना कोणताही अडथळा येणार नाही याची संबंधित विभागप्रमुखांनी खबरदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत दिले.
महानगरातील विकास कामांसमवेत ‘जायका’कडून नागनदीच्या विकासासाठी 2 हजार 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून सिवरेज पाइपलाईन नेटवर्क अधिक मजबूत व परिपूर्ण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यादृष्टीने सर्व विभागाच्या संबंधित विभागानी समन्वय साधून त्याचे नियोजन करणे तेवढेच महत्वाचे आहे.
अलिकडच्या काळात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मलनिस्सारणचे गर्डर चोक झाल्यामुळे पाणी तुंबल्याने काही भागात नागरिकांना त्रास सहन करावा लागला. हे लक्षात घेता पाइपलाईन व गर्डर यांच्या योग्य निगासाठी असलेल्या वाहन व्यवस्थेत आणखी भर टाकून ही वाहने वाढविण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पावसाळा पाठोपाठ येणारे साथीचे आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने अत्यंत जबाबदारीने सार्वजनिक आरोग्याचे भान ठेवून काम करणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या कामात होणारा गलथानपणा खपवून घेतला जाणार नाही. याचबरोबर यापूर्वी सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडे जी जबाबदारी सोपविली होती ती जबाबदारी त्यांना व्यवस्थित पार पाडता आली नाही याबद्दल अनेक तक्रारी आहेत. हे लक्षात घेता हे काम पुन्हा आरोग्य विभागाकडे देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.